रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी खालगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने गेली दोन-तीन दिवस येथील हजारो रुग्णांची फार मोठी गैरसोय होत होती. ऐन पावसाळ्यात डॉक्टर नसल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत होता. मात्र तेही दूरवर असल्याने आर्थिक भुर्दंड ही सोसावा लागत होता. याबाबत ‘जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांची गैरसोय’ अशा मथळ्याखाली ग्रामीण वार्ता ने शुक्रवारी सकाळी वृत्त प्रसारित केले होते. या वृत्ताची दखल घेत 8 तासातच या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.मीना संपत या वैद्यकीय अधिकारी म्हणून आजपासून पुन्हा रुजू झाल्या आहेत. त्या यापूर्वी याच आरोग्य केंद्रात कार्यरत होत्या. मात्र आता त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.
जाकादेवी येथे गेली तीन वर्ष वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ.मीना संपत या काम पाहत होत्या. त्यांच्या काळात रुग्णांना उत्तम सेवा मिळाली होती. त्यामुळे रुग्णांनी समाधानही व्यक्त केले होते. मात्र त्यांचा कार्यकाल ३० जून रोजी संपुष्टात आला होता. त्यामुळे त्यांची बदली अन्यत्र होणार होती.
त्यांच्या ऐवजी रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभागाकडून अधिकृत वैद्यकीय अधिकारी नियुक्त केला नसल्याने येथे वृद्ध, अपघात ग्रस्त रुग्णांची फार मोठी गैरसोय होऊ लागली होती. अधिभार दिलेले डॉक्टर हे पूर्ण दिवस अथवा रात्रीच्या वेळी उपलब्ध नसल्याने जाकादेवी दशक्रोशीतील सर्वसामान्य गरीब ,कष्टकरी, शेतकरी वर्गातील रुग्णांनी नेमके कोणत्या ठिकाणी उपचार घ्यावा ? असा प्रश्न रुग्णांपुढे उभा राहिला आहे. ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी शासनाने सर्वसामान्य जनतेला चांगली सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी द्यावा अशी मागणी जाकादेवी ओरी विभागातील युवा नेते संकेत उर्फ बंड्या देसाई यांनी केली आहे.
जाकादेवी पंचक्रोशीचा विचार करता जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दोन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर आहेत. यामध्ये डॉक्टर मनाली चव्हाण या गेला महिनाभर जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध नाहीत. त्यामुळे डॉक्टर मानसी चव्हाण यांचा कार्यभार एकट्या डॉ. मीना संपत यांच्यावर पडत आहे. तरीही 24 तास रुग्णाला सेवा देण्यासाठी डॉ. मीना संपत या सदैव तत्पर असतात. प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन-तीन दिवस डॉक्टर नसल्याने अनेक रुग्णांना खाजगी दवाखान्यात जाऊन आर्थिक उदंड सोसावा लागला होता. जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्त केलेल्या व सध्या कार्यरत नसलेल्या डॉ. मानसी चव्हाण यांचीही प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्त करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान डॉक्टर गैरसोयीबाबत ग्रामीण वार्ता ने आज सकाळी वृत्त प्रसिद्ध केले. याची दखल घेत जिल्हा परिषद आरोग्य विभागाने अवघ्या 8 तासात या ठिकाणी आरोग्य डॉ.मीना संपत यांना पुन्हा त्याच ठिकाणी नियुक्ती केली. त्यांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे आता जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी मिळाल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ आनंदित झाले आहेत. त्यांनी आरोग्य विभागाचे आणि ग्रामीण वार्ता चे आभार मानले.
ग्रामीण वार्ता इफेक्ट : जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात 8 तासात वैद्यकीय अधिकारी हजर

Leave a Comment