GRAMIN SEARCH BANNER

मुंबईत ११ लाख दुबार मतदार; आमदार ज्योती गायकवाड यांचा आरोप

Gramin Varta
87 Views

मुंबई: विरोधकांनी मतदार यादीतील दुबार मतदारांवरून जोरदार आक्षेप नोंदवला जात आहे. मुंबई महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवरून काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांनी निशाणा साधला असून मुंबईत तब्बल ११ लाख दुबार मतदार असल्याचा आरोप केला आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर दुबार मतदार असल्याने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे मत त्यांनी मांडले. जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात सर्वाधिक दुबार मतदार आढळून आले असून त्यांची संख्या ४ लाख ९८ हजार ५९७ इतकी आहे. पूर्व उपनगरात ३ लाख २९ हजार २१६ मतदारांची पुनर्नोंदणी तर शहर विभागात २ लाख ७३ हजार मतदारांची दुबार नोंद झाली आहे. काही ठिकाणी तर एका मतदाराचे नाव दोनपेक्षा अधिक वेळा दिसत असल्याचा दावा त्यांनी केला. स्थानिक निवडणुकांमध्ये काही मतांचे अंतर निर्णायक ठरू शकते. अशा परिस्थितीत लाखो दुबार मतदार असणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे ज्योती गायकवाड म्हणाल्या. काँग्रेस या मुद्यावर लढण्यासाठी तयार असून न्याय्य आणि पारदर्शकरीत्या निवडणुका व्हाव्यात अशी मागणी ज्योती गायकवाड यांनी केली.

दुबार नावे पूर्णपणे हटवल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत निवडणुका घेऊ नयेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण करायच्या आहेत. अनेक महापालिका आणि नगरपालिका सध्या प्रशासनाच्या ताब्यात आहेत. कोरोनामुळे आणि आरक्षणाच्या वादामुळे निवडणुका बराच काळ रखडल्या. त्यामुळे यावेळी निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडूनही याबाबत दक्षता घेण्यात येत असून मतदारांची नावे जरी दुबार असली तरी त्यांनी दोनदा मतदान करू नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येणार आहेत. सर्व राजकीय कार्यालयांना मतदारयाद्या पुरविण्यात आल्या असून त्यातील दुबार मतदार लक्षात आल्यास त्यांची नावे वगळण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या मतदारसंघा एकाच मतदाराचे नाव आढळल्यास एकदा मतदान केल्यानंतर त्याच्याकडून त्याबाबतचे हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे.

Total Visitor Counter

3199513
Share This Article