रत्नागिरी: शहरातील मारुती मंदिर, गोडबोले स्टॉप या वर्दळीच्या परिसरात गुरुवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी दोन तरुणांनी पोलिसांच्या उपस्थितीतच एकमेकांना मारहाण करत गोंधळ घातला. सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या या कृत्याबद्दल रत्नागिरी शहर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ नुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची फिर्याद पोलीस मुख्यालय, रत्नागिरी येथे नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल भूषण शांताराम पाताडे यांनी दिली आहे. त्यांनी नमूद केल्यानुसार, दि. ३०/१०/२०२५ रोजी सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास गोडबोले स्टॉप येथील मारुती मंदिर परिसरात ऋतिक बेरप्पा खेत्री (वय २०, रा. कुवारबाव, रविंद्रनगर) आणि आकाश चंद्रकांत खेत्री (वय २३, रा. क्रांतीनगर झोपडपट्टी) हे दोन्ही तरुण एकमेकांशी वाद घालत होते.
हा वाद विकोपाला जाऊन, उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांसमक्षच या दोघांनी परस्परांना हाताच्या थापटांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच, त्यांनी एकमेकांना अश्लील शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी दंगलसदृश वातावरण निर्माण केल्याबद्दल फिर्यादीने तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गु.आर.नं. ४१३/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११४(२), २१२ आणि ११२(२) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना घडल्याच्या काही तासांनी, दुपारी १२.२० वाजता पोलीस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला.
शहरातील मध्यवर्ती भागात पोलिसांसमोरच झालेल्या या हाणामारीमुळे नागरिकांमध्ये चर्चा सुरू असून, रत्नागिरी शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





