GRAMIN SEARCH BANNER

इटलीत बंदी घातलेल्या कंपनीचे रत्नागिरीत उत्पादन नको; उबाठा शिवसेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे बंदीची मागणी

Gramin Varta
313 Views

रत्नागिरी : जिल्ह्यात पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर व घातक ठरू शकणाऱ्या एका रासायनिक कंपनीच्या आगमनावरून सध्या मोठे वादळ उठले आहे. इटलीमध्ये गंभीर प्रदूषणामुळे बंद पडलेल्या ‘मिटेनी एस.पी.ए.’ या कंपनीची यंत्रसामग्री लोटे परशुराम एमआयडीसीत वापरली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे शुक्रवारी निवेदन देत, या कंपनीला रत्नागिरीत येण्यास किंवा कार्यरत होण्यास तातडीने बंदी घालण्याची मागणी केली आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख (दक्षिण) दत्ता कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. इटलीतील ‘मिटेनी एस.पी.ए.’ ही रासायनिक कंपनी मानवी जीवन व पर्यावरणासाठी अत्यंत घातक रसायनांचे उत्पादन करत होती. ही कंपनी ‘फॉरेव्हर केमिकल्स’ म्हणून ओळखली जाणारी रसायने तयार करत होती, जी निसर्गात तसेच मानवी शरीरात दीर्घकाळ टिकून राहतात. तपासणीत असे उघड झाले होते की, या रसायनांमुळे सुमारे साडेतीन लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाले होते. परिणामी परिसरातील नागरिकांमध्ये कर्करोग, हार्मोनल विकार आणि वंध्यत्व यांसारख्या आजारांचा धोका वाढल्याचे वैज्ञानिक अभ्यासातून स्पष्ट झाले होते. या गंभीर परिणामांमुळेच इटली सरकारने या कंपनीवर बंदी घातली होती.

‘लक्ष्मी ऑर्गेनिक्स’च्या उपकंपनीकडून यंत्रसामग्रीचा वापर
अशी वादग्रस्त कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम येथे येत असल्याची माहिती समोर आली आहे. ‘मिटेनी एस.पी.ए.’ची यंत्रसामग्री भारतीय कंपनी लक्ष्मी ऑर्गेनिक्स इंडस्ट्रीजच्या ‘विवा लाईफ सायन्सेस’ या उपकंपनीने खरेदी करून जिल्ह्यात वापरात आणल्याचा दावा करण्यात येत आहे. या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून वृत्तपत्रांतही याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे या कंपनीवर तातडीने बंदी न घातल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिवसेनेने दिला असून, उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. एखाद्या देशाने दंड आकारून कंपनीवर बंदी घातली असताना, निसर्गरम्य कोकणात असा प्रकल्प सुरू होणार असेल तर त्याला प्रचंड विरोध केला जाईल, अशी भूमिका पक्षाने मांडली आहे.

कोकणचे हित जपण्यासाठी प्रशासनाने तातडीने पुढाकार घेऊन अशी कोणती कंपनी आली आहे का, याची सखोल पडताळणी करावी आणि ती येत असल्यास किंवा येण्याच्या तयारीत असल्यास प्रशासकीय पातळीवर विरोध करून लोकांचे, शेतीचे व पर्यावरणाचे हित जपावे, अशी मागणी दत्ता कदम यांनी केली आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलून अधिकृत माहिती दिली नाही आणि कंपनीवर बंदी घातली नाही, तर लोकहितासाठी शिवसेना रस्त्यावर उतरेल आणि कोकणच्या मुळावर उठणाऱ्या या कंपनीविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल. अशा परिस्थितीत होणाऱ्या कोणत्याही घटनांना प्रशासन जबाबदार राहील, असा सज्जड इशाराही देण्यात आला आहे.

यावेळी चिपळूण तालुकाप्रमुख बळीराम गुजर, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, सुभाष रहाटे, महिला विधानसभा क्षेत्र संघटक सायली पवार, माजी नगरसेविका रशिदा गोदड, वांद्री माजी सरपंच अनिषा नागवेकर, नगरसेविका फौजिया मुजावर, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, विभागप्रमुख अजित गुजर, नयन साळवी, मयुरेश पाटील, शशिकांत बारगोडे, तन्वीर मुजावर, संदेश भिसे, उपविभागप्रमुख सचिन सावंतदेसाई, दिलावर गोदड, शाहनवाज काझी, राजेंद्र सुर्वे, शांताराम गुरव, माजी शाखाप्रमुख विनायक वास्कर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Total Visitor Counter

3375708
Share This Article