संगमेश्वर/ दिनेश आंब्रे: आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वाचे औचित्य साधून, एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प देवरूख, संगमेश्वर अंतर्गत रामपेठ येथील अंगणवाडीने बालकांच्या वारकरी दिंडीचे आयोजन केले होते. अंगणवाडी सेविका पल्लवी शेरे आणि मदतनीस शीतल आंब्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या दिंडी सोहळ्यात चिमुकल्यांनी श्री विठ्ठल, रखुमाई, जनाबाई आणि तुकाराम महाराज अशा महाराष्ट्राच्या संत परंपरेतील महान संतांच्या वेशभूषा साकारल्या होत्या. काही बालकांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन होते, तर काहींच्या हातात टाळ, डोक्यावर सफेद टोपी, गळ्यात तुळशीच्या माळा आणि कपाळाला चंदनाचा टिळा लावून ही बालरुपी संतमांदियाळी आपल्या पालकांसह दिंडीत सहभागी झाली होती.
रामपेठ अंगणवाडी ते गणपती मंदिर, नावडी या मार्गावर निघालेल्या या वारकरी दिंडीत “जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल” तसेच संत ज्ञानोबा, संत तुकाराम महाराज यांच्या जयघोषांनी आसमंत दुमदुमून गेला. श्री गणपती मंदिरात पोहोचल्यानंतर बालकांनी गोल फेर धरून “जय जय विठ्ठल रखुमाई” चा गजर केला. नावडीच्या सरपंच सौ. प्रज्ञा कोळवणकर यांनी या कार्यक्रमास भेट देऊन बालकांना शुभेच्छा दिल्या. राधा संकेत शिरगावकर यांच्या वतीने मुलांना फळे वाटप करण्यात आली.
यावेळी महिला पालकांनी फुगड्यांचा मनसोक्त आनंद लुटला. रामपेठ अंगणवाडीच्या वतीने बालकांना खाऊ वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शिरगावकर यांनीही या उपक्रमास भेट देऊन कौतुक केले. बालकांच्या आनंदात पालकही रममाण झालेले दिसले. त्यानंतर गणपती मंदिरापासून श्रीराम मंदिर, रामपेठ अशी पुन्हा दिंडी काढण्यात आली. श्रीराम मंदिरात सामूहिक भजन करण्यात आले. त्यानंतर अंगणवाडीत परतल्यानंतर सेविका पल्लवी शेरे आणि मदतनीस शीतल आंब्रे यांनी पालक आणि मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. कैलास (बाळा) चोचे यांच्याकडून राम मंदिरात खाऊ वाटप करण्यात आले. हा अभिनव उपक्रम बालकांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांची रुजवात करणारा ठरला.