रत्नागिरी : हातखंबा झरेवाडी फाट्याजवळ भरधाव वेगाने दुचाकी चालवल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार आणि त्याच्यासोबत मागे बसलेला एकजण जखमी झाले आहेत. दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पियुष प्रेमकुमार भारती (वय १८, रा. खेडशी गयाळवाडी, ता.जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना २८ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता घडली.
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहन रामचंद्र कांबळे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी पियुष प्रेमकुमार भारती हा त्याच्या (एमएच-०८/ए.वाय/०२८६) मोटारसायकलने हातखंबा ते माचाळ लांजा असा जात होता. यावेळी त्याच्या पाठीमागील सीटवर ऋषिकेश शिवराम बावदाने (रा. तळेकांटे, संगमेश्वर) बसला होता.
पियुष भारती याने हेल्मेट न घालता, रस्ता वळणाचा आहे हे माहित असूनही, अतिवेगात आणि हयगईने गाडी चालवली. त्याने समोरच्या गाड्यांना ओव्हरटेक करत असताना, समोरून गोवा ते मुंबई जाणारा (जीजे-०३/बी.व्ही/०१०८) ट्रकला पुढील बाजूने धडक दिली. या अपघातात पियुष भारती आणि ऋषिकेश बावदाने यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या असून, वाहनांचेही नुकसान झाले आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी पीयूष भारती याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.