कराड : कराड-रत्नागिरी राज्य महामार्गावर आटुगडेवाडी (मेणी, ता. शिराळा) येथे शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या खासगी गाडीला सोमवारी (ता. १०) सकाळी साडेनऊच्या सुमारास भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला, तर चार विद्यार्थी जखमी झाले. श्रीशा श्रीनाथ इंगळे (वय ५, रा. मेणी) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. या घटनेने मेणी परिसरावर शोककळा पसरली असून, चिमुकलीच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
येळापूरजवळील वाघमारेवाडी येथे वर्षभरापूर्वी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू झाली आहे. मेणी परिसरातील विद्यार्थ्यांना या शाळेत ने-आण करण्यासाठी युवराज वसंत कदम (रा. कुमठे, पवारवाडी, ता. पाटण; सध्या रा. शेडगेवाडी) यांची खासगी गाडी सोमवारी सकाळी विद्यार्थ्यांना घेऊन शाळेच्या दिशेने निघाली होती.
आटुगडेवाडी येथे आल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. अनियंत्रित झालेली गाडी रस्त्यालगत असलेल्या पुलाच्या कठड्यावर जाऊन जोरदार आदळली. या भीषण धडकेत चालकाच्या शेजारी बसलेल्या श्रीशाच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. उपचाराची संधी मिळण्यापूर्वीच तिचा जागीच मृत्यू झाला. शाळेच्या वाटेवर निघालेल्या अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर काळाने घाला घातल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
या अपघातात अंशिका संजय पाटील (वय ४, रा. मेणी), अभिराज सागर कडोले (वय ४, रा. येळापूर), ज्ञानेश्वरी दत्तात्रय आटुगडे (वय ८, रा. आटुगडेवाडी) आणि तनुष ऋषिकेश पाटील (रा. हात्तेगाव, ता. शिराळा) हे विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने कराड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. आपल्या चिमुकल्यांना पाहण्यासाठी घटनास्थळी जमलेल्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी महादेव सुरेश इंगळे यांनी कोकरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक ज्योती सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल अभिजित कारंजकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान, घटनेनंतर आमदार सत्यजित देशमुख आणि जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांनी कोकरूड ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची भेट घेतली. त्यांनी जखमी मुलांच्या प्रकृतीची विचारपूस करून पालकांना धीर दिला.
कराड-रत्नागिरी महामार्गावरील या भीषण अपघाताने एका कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावून घेतला असून, शाळेच्या वाटेवर गेलेल्या पाच वर्षांच्या श्रीशाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरातील नागरिकांचे मन हेलावून गेले आहे.
कराड-रत्नागिरी महामार्गावर भीषण अपघात; शाळेत निघालेल्या ५ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत, चार विद्यार्थी गंभीर
Leave a Comment






