संगमेश्वर : तालुक्यातील भडकंबा येथील मोरेवाडी परिसरात शनिवारी रात्री घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण गाव हादरून गेले आहे. गावातील आवळीचा माळ या मोकळ्या टेकडीवर दोन ताकदवान गवे रेडे एकमेकांशी जबरदस्त झुंज देत होते. ही झुंज इतकी तीव्र होती की दोन्ही गव्यांची शिंगे एकमेकांत घट्ट अडकली आणि ते सुटू शकले नाहीत. अखेरीस झुंजार लढतीदरम्यान श्वास गुदमरल्याने दोन्ही गव्यांचा मृत्यू झाला.
रविवारी पहाटे या घटनेची चाहूल ग्रामस्थांना लागली. सकाळी रोजच्या प्रमाणे जनावरांना चारण्यासाठी गेलेल्या काही ग्रामस्थांना आवळीच्या माळावर दोन प्रचंड गवे निश्चल अवस्थेत दिसले. जवळ जाऊन पाहणी केली असता त्यांच्या शिंगांमध्ये घट्ट अडकलेले गाठोरे आणि मृत देह पाहून ग्रामस्थ थक्क झाले.
ग्रामस्थांनी तत्काळ माजी उपसरपंच बापू शिंदे आणि पोलीस पाटील दाभोळकर यांना ही माहिती दिली. दोघांनीही तातडीने वनविभाग आणि पोलिस यांना कळविले. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि स्थानिक पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात ही नैसर्गिक घटना असल्याचे स्पष्ट झाले असून परिसरातील इतर जनावरांचीही तपासणी करण्यात आली.
गव्यांची झुंज हे रानटी प्राण्यांच्या स्वभावातील नैसर्गिक वर्तन असले, तरी त्यांच्या मृत्यूने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. हे दोन्ही गवे परिसरात कायम वास्तव्य करत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. ग्रामस्थांच्या मते, हे दोन्ही रेडे अनेकदा एकाच माळावर दिसत असत; परंतु इतक्या तीव्र झुंजीचे हे पहिलेच उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वनविभागाकडून दोन्ही गव्यांचे मृतदेह पंचनामा करून जंगलात योग्य ठिकाणी अंत्यविधी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संगमेश्वर भडकंबा येथे गवा रेड्याच्या झुंजीत दोघांचाही मृत्यू
