GRAMIN SEARCH BANNER

हेड अँड नेक कर्करोगाच्या १५० प्रमुख शस्त्रक्रियांमधून कोकणातील रुग्णांना दिला नवजीवनाचा विश्वास- डॉ. एहसान शेख

Gramin Varta
169 Views

चिपळूण- कर्करोग तज्ज्ञ डॉ. एहसान शेख हे कोकणातील दुर्गम व ग्रामीण भागात कर्करोगासारख्या गंभीर आजारावर प्रभावी उपचार देत येथील रुग्णांकरिता आशेचा किरण ठरले आहेत.गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत डॉ. एहसान शेख यांनी हेड अँड नेक कर्करोगाच्या तब्बल १५० प्रमुख शस्त्रक्रिया चिपळूण येथील ऑंको लाईफ केअर कॅन्सर सेंटर येथे यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. यामध्ये ९६ पुरुष आणि ५४ महिला रुग्णांचा समावेश आहे. ही आकडेवारी कोकणात वाढत असलेल्या कर्करोगाच्या रुग्णांवर प्रभावी उपचार करण्याची त्यांची क्षमता अधोरेखित करते.

या शस्त्रक्रियांमध्ये तोंडाचा कर्करोग, जीभ व जबडा, स्वरयंत्र , घसा, थायरॉईड ग्रंथी तसेच जटिल पुनर्रचनात्मक (Reconstructive) शस्त्रक्रियांचा समावेश आहे. आधुनिक तंत्रज्ञान, अचूक निदान पद्धती तसेच बहुवैद्यकीय उपचारांच्या मदतीने अनेक रुग्णांना त्यांनी नवजीवन दिले आहे.

डॉ. शेख यांची ओळख केवळ ऑपरेशन थिएटरमधील यशापुरती मर्यादित नाही तर गरिब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये ते ‘गरिबांचा डॉक्टर’ म्हणून ओळखले जातात. रुग्णांशी असलेला त्यांचा संवाद, व्यथा समजून घेण्याची त्यांची वृत्ती आणि आपुलकीची भावना यामुळे रुग्णांच्या मनात त्यांनी आपली एक वेगळीच जागा निर्माण केली आहे.

डॉ. शेख यांच्याविषयी आपले मत व्यक्त करताना अनेक रुग्ण सांगतात की, “डॉक्टरांना भेटल्यानंतर, त्यांच्या मनमोकळा संवाद साधून तिथल्या तिथेच आमचा अर्धा आजार बरा झाल्यासारखे वाटते.” डॉ. शेख हे केवळ आजारावर उपचार करत नाहीत, तर रुग्णाच्या मानसिक अवस्थेकडेही तितक्याच गांभीर्याने पाहतात. कर्करोगासारख्या गंभीर आजारात त्यांचे धीर देणारे शब्द आणि सकारात्मक दृष्टीकोन हे त्या रुग्णासाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी सर्वात मोठा आधार ठरतो.

डॉ. एहसान शेख हे मूळचे महाड (जि. रायगड) येथील असून, कोकणातील दुर्गम भागातील रुग्णसेवेला त्यांनी आपल्या आयुष्याचे ध्येय मानले आहे. महाड येथे त्यांचे शेख मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल असून, चिपळूणमधील ऑन्को लाईफ केअर कॅन्सर हॉस्पिटल येथे ते कर्करोग शल्यचिकित्सक म्हणून कार्यरत आहेत.

मुंबईसारख्या महानगरात मोठ्या प्रमाणावर सरावाची संधी असतानाही, कोकणात राहून येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना दर्जेदार कर्करोग उपचार मिळावेत, हा ध्यास त्यांनी उराशी बाळगला. हीच सेवाभावी वृत्ती आणि कठोर परिश्रमामुळे त्यांनी अल्पावधीत १५० प्रमुख शस्त्रक्रियांचा टप्पा गाठला आहे.

डॉ. एहसान शेख यांची कारकीर्द ही केवळ यशस्वी शस्त्रक्रियांची आकडेवारी नसून, तर कोकणातील सामान्य माणसाचा विश्वास जिंकणे हे त्यांचे खरे यश आहे. आधुनिक वैद्यकीय कौशल्य, ग्रामीण भागाविषयी असेलला बांधिलकी आणि उत्तम रुग्णसेवेचा संगम त्यांना समाजात एक आदर्श व लोकाभिमुख डॉक्टर म्हणून वेगळे स्थान देतो.

Total Visitor Counter

3388325
Share This Article