GRAMIN SEARCH BANNER

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात संघटनात्मक बदल

Gramin Varta
47 Views

प्रांताऐवजी विभागनिहाय रचना; महाराष्ट्रात आता 7 विभाग

नागपुर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारक रचनेत महत्त्वपूर्ण बदलांना मान्यता देण्यात आली असून, आता प्रांताऐवजी विभागनिहाय कार्यपद्धती लागू केली जाणार आहे.

या नव्या रचनेनुसार महाराष्ट्रातील कामकाजाचे विभाजन 4 प्रांतांऐवजी 7 विभागांमध्ये केले जाणार असल्याची माहिती संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार यांनी आज, मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संघाचे प्रांत कार्यवाह अतुल मोघे, महानगर कार्यवाह रविंद्र बोकारे उपस्थित होते.

यासंदर्भात तामशेट्टीवार यांनी सांगितले की, ही नवीन रचना पुढील वर्षभरात टप्प्याटप्प्याने निश्चित करून अंमलात आणली जाणार आहे. तसेच देशभरात संघशाखांची संख्या वाढविण्यावरही विशेष भर दिला जाणार आहे. वर्तमानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यवस्थेत पश्चिम क्षेत्रात महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या राज्यांचा समावेश असून त्यात 6 प्रांत आहेत. मात्र नव्या रचनेनुसार गुजरातमध्ये 3 विभाग आणि महाराष्ट्रात 7 विभाग असतील राज्याच्या 7 विभागांमध्ये मुंबई (स्वतंत्र विभाग), कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, देवगिरी, पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ यांचा समावेश आहे. पूर्वी मुंबई हा कोकण प्रांताचा भाग होता, मात्र आता तो स्वतंत्र विभाग म्हणून कार्य करेल असे तामशेट्टीवार यांनी स्पष्ट केले. सध्या संघाच्या व्यवस्थेत देशभरात 46 प्रांत कार्यरत आहेत. नवीन रचना लागू झाल्यानंतर विभागांची संख्या 86 पर्यंत वाढेल, अशी माहिती तामशेट्टीवार यांनी दिली.

विदर्भातील शाखावाढ

विदर्भातील संघकार्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे 2025 मध्ये : 1177 ठिकाणी 2058 शाखा

सध्या: 2502 शाखा (21 टक्क्यां पेक्षा अधिक वाढ)

साप्ताहिक मिलन: 341 वरून 372 पर्यंत वाढ

शताब्दी वर्षातील उपक्रम

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त व्यापक गृहसंपर्क मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत संघाने सुमारे 12 हजार 500 गावांमध्ये संपर्क केला असून 28.74 लाख घरांपर्यंत स्वयंसेवक पोहचलेत. तसेच विदर्भात 826 ठिकाणी हिंदू संमेलने घेण्यात आली. यासोबतच सात प्रकारचे विविध कार्यक्रम राबविण्याचे नियोजन असून, विशेषतः तरुणांशी संपर्क वाढविणे आणि सोशल मीडियावर सक्रियता वाढविण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. संघाच्या या नव्या विभागनिहाय रचनेमुळे कार्यक्षमता वाढविणे, स्थानिक पातळीवर अधिक प्रभावी संपर्क साधणे आणि संघकार्याचा विस्तार वेगाने करण्याचा उद्देश आहे.-

Total Visitor Counter

3375470
Share This Article