३६ तासांच्या परिश्रमानंतर कर्जी खाडीपट्ट्यातील वीजपुरवठा सुरळीत
खेड: महावितरणच्या खेड विभागातील लोटे उपविभागांतर्गत येणाऱ्या कर्जी खाडीपट्टा या ठिकाणी वीज वाहिन्यांवरील असलेले पिन इन्सुलेटर व डिस्क इन्सुलेटर यांमध्ये मोठा बिघाड होऊन खाडीपट्ट्यातील नांदगाव, सिरसी, मुमके, कोरेगाव, बहिरोली, पन्हाळजे आदी गावे व वाडी वस्ती यांचा वीज पुरवठा हा बाधित झाला होता. मात्र अतिशय जंगलमय भाग व सततचा कोसळणारा मुसळधार पाऊस अशा आव्हानात्मक परिस्थितीतही महावितरणच्या आठ अधिकाऱ्यांनी व ४० कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत ३६ तासांमध्ये या ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला.
सोमवार दिनांक २१ जुलै रोजी सकाळच्या सुमारास सुमारे १९ गावे व वाड्यावस्त्या यांचा वीज पुरवठा वादळ वारे व पाऊस यांमुळे प्रभावित झाला. यामुळे सुमारे ८ हजार ग्राहकांचा वीज पुरवठा बाधित झाला. कर्जी खाडीपट्टा हा जगबुडी नदीच्या किनारी वसलेला सखल भाग आहे. या भागात घनदाट जंगल व जगबुडी नदीच्या प्रवाहाबरोबर असणारे सखल भाग व सततचा पाऊस यामुळे वीजपूरवठा पूर्ववत करण्यास अनेक अडचणी येत होत्या. मात्र महावितरणच्या लोटे उपविभाग, खेड उपविभाग व विभागीय कार्यालय खेड यांमधील ८ अभियंते व सुमारे ४० जनमित्र व बाह्यस्तोत कर्मचारी यांच्या मदतीने सलग ३६ तास आव्हानात्मक परिस्थितीत अहोरात्र काम करून नांदगाव, सिरसी, मुमके, कोरेगाव, बहिरोली, पन्हाळजे आदी खाडीपट्टा गावांमधील ३३ केव्ही व ११ केव्ही वीज वाहिन्यांवरील खराब झालेले ११ पिन इन्सुलेटर व डिस्क इन्सुलेटर बदलले. सदरील ३३ केव्ही वाहिन्यांची लांबी ३९ किलोमीटर पेक्षा जास्त असून ११ केव्ही वाहिन्यांची लांबी ६० किलोमीटर पेक्षा जास्त आहे. सर्वांनी सांघिक कामगिरी करून ही अवघड मोहीम यशस्वी करत ग्राहकांचा वीजपुरवठा बुधवार दिनांक २३ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता पूर्ववत केला.
रत्नागिरी परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अधीक्षक अभियंता सुनील कुमार माने यांच्या मार्गदर्शनाखाली खेड विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद बाबरेकर, उपकार्यकारी अभियंते सचिन वेलणकर, दीपक सपकाळ, निलेश नानोटे, सहाय्यक अभियंते समीर कदम, सिद्धार्थ पेटकर, रवी निकनवरे व कनिष्ठ अभियंता रोहन बडगुजर या सर्वांच्या टीमने ४० जनमित्र व बाह्यस्तोत कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कामगिरी पार पाडली.
खेड: महावितरणच्या ४८ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम यशस्वी
