GRAMIN SEARCH BANNER

खेड : चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर पतीचा जीवघेणा हल्ला

Gramin Varta
201 Views

खेड : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत दारूच्या नशेत पतीने पत्नीच्या डोक्यात बसण्याचा लाकडी पाट मारून तिला जखमी केल्याची संतापजनक घटना खेड तालुक्यातील चिंचवली चव्हाणवाडी येथे घडली आहे. या हल्ल्यात पत्नी विजया विजय चिंचविलकर (वय ३६) या जखमी झाल्या असून, याप्रकरणी त्यांचे पती विजय रघुनाथ चिंचविलकर (वय ३७) याच्यावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घरात आपली मुले आणि दीर समोर असतानाच हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २३ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी विजया चिंचविलकर या चिंचवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मदतनीस म्हणून काम करतात. घटनेच्या दिवशी रात्री त्या आपल्या राहत्या घरात बेडरूममध्ये त्यांचे मोठे दीर रणजित, आपली मुले आणि पती विजय यांच्यासह गप्पा मारत बसल्या होत्या.

यावेळी पती विजय रघुनाथ चिंचविलकर यांनी दारूच्या नशेत अचानक विजया यांच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली आणि त्यांच्याशी नाहक वाद घालू लागले.
कौटुंबिक गप्पा सुरू असतानाच संशयाचे भूत मानगुटीवर बसलेल्या आरोपीने रागाच्या भरात बेडरूममध्ये असलेला बसण्याचा जड लाकडी पाट उचलला आणि तो जोरात पत्नी विजया यांच्या कपाळावर मारला. या हल्ल्यात विजया यांच्या डोक्याला दुखापत झाली. या घटनेनंतर जखमी विजया यांनी २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास खेड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पती विजय चिंचविलकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याची नोंद खेड पोलीस ठाण्यात ३६०/२०२५ क्रमांकाने करण्यात आली असून, कौटुंबिक वादातून आणि व्यसनाच्या आहारी जाऊन पतीनेच पत्नीवर हल्ला केल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3369483
Share This Article