GRAMIN SEARCH BANNER

तिवरे पुनर्वसित गावासाठी ४६.९१ लाखांच्या नागरी सुविधांना मंजुरी; आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश

Gramin Varta
110 Views

चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील पूरग्रस्तांच्या पुनर्वसित गावासाठी अखेर मोठा दिलासा देणारा निर्णय झाला असून, या गावातील रस्ते व गटर बांधकामासारख्या अत्यावश्यक नागरी सुविधांसाठी तब्बल ४६.९१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामागे आमदार शेखर निकम यांचा सातत्यपूर्ण आणि ठाम पाठपुरावा निर्णायक ठरला आहे. तिवरे दुर्घटनेनंतर पुनर्वसित झालेल्या कुटुंबांना केवळ हक्काचे घरच नव्हे, तर सर्व मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार निकम यांनी विशेष लक्ष दिले होते. पूरग्रस्त नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांनी वारंवार मंत्री महोदय व शासन दरबारी पाठपुरावा केल्याने हा निधी मिळवण्यात यश आले आहे. या निधीतून आता पुनर्वसित गावात दर्जेदार रस्ते आणि सांडपाणी निचऱ्यासाठी गटर बांधकामे पूर्ण होणार असून, यामुळे येथील नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुसह्य होणार आहे.

या निधी मंजुरीबद्दल आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उद्योग व पालकमंत्री उदय सामंत तसेच मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत. हा निर्णय म्हणजे केवळ निधी मंजुरी नसून जनतेच्या वेदना समजून घेणाऱ्या आणि विकासाची गती कायम राखणाऱ्या नेतृत्वाचा विजय असल्याची भावना व्यक्त होत आहे. याचवेळी आमदार निकम यांनी दिवंगत माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची आठवण काढत त्यांना त्रिवार अभिवादन केले. तिवरेवासियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्याने संपूर्ण परिसरात समाधान व्यक्त केले जात असून, आमदार निकम यांनी पुन्हा एकदा विकासाच्या माध्यमातून जनतेचा विश्वास सार्थ ठरवला आहे.

Total Visitor Counter

3391780
Share This Article