लोटे एमआयडीसीतील पुष्कर कंपनीच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू; मालकासह पाच जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

खेड: लोटे एमआयडीसीमधील पुष्कर कंपनीच्या निष्काळजीपणामुळे एका ४८ वर्षीय महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या प्रकरणी कंपनीचे मालक, व्यवस्थापक आणि सुरक्षा व्यवस्थापकासह पाच जणांविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शकुंतला बबन सोनवणे (वय ४८, रा. बहादूरशेख नाका, चिपळूण, मूळ रा. सांगली) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी ललिता चंद्रकांत सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गत १२ मार्च रोजी दुपारी १२:३० वाजता शकुंतला सोनवणे आणि तक्रारदार ललिता सोनवणे या दोघी लोटे एमआयडीसी येथील पुष्कर कंपनीच्या बाहेरील परिसरात कचरा गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी कंपनीने प्रक्रियेनंतर बाहेर उघड्यावर टाकलेल्या केमिकलयुक्त अतिशय गरम मातीच्या ढिगाऱ्यात शकुंतला यांचा पाय अडकून त्या आत रुतल्या गेल्या. या रसायनायुक्त गरम मातीमुळे त्यांच्या अंगावरील कपडे जळून कमरेखालील शरीर आणि दोन्ही हात गंभीररीत्या भाजले गेले.

त्यांना तातडीने उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान २२ मार्च रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सखोल माहिती घेतली असता, कंपनीचे सेफ्टी मॅनेजर सुधाकर जगताप, एच.आर. मॅनेजर सचिन मनवाल, कमर्शियल मॅनेजर रवींद्रकुमार भुतिया, मालक गौतम मखरिया आणि इतर व्यवस्थापन यांनी ही गरम माती उघड्यावर टाकल्याने कुणाचाही जीव जाऊ शकतो, याची जाणीव असतानाही सुरक्षेचे कोणतेही नियम न पाळता हा घातक कचरा उघड्यावर टाकल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रशासनाने या गंभीर घटनेची दखल घेत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *