चिपळूणमध्ये बोरिंगच्या पाण्यावरून भावंडांमध्ये राडा; लोखंडी पाईपने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

चिपळूण: तालुक्यातील खेर्डी बौद्धवाडी येथे सामाईक बोरिंगचे पाणी भरण्यावरून झालेल्या वादातून एका ५५ वर्षीय व्यक्तीला लोखंडी पाईपने डोक्यात मारून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही घटना १ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. रवींद्र भिकाजी मोहिते (वय ५५, रा. खेर्डी बौद्धवाडी) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या फिर्यादीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवींद्र मोहिते हे त्यांच्या सामाईक बोरिंगचे पाणी भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे नातेवाईक असलेले आरोपी दिलीप भिकाजी मोहिते (वय ५८) यांनी “तू पाणी भरायचे नाही, तुझा बोरिंगशी काही संबंध नाही, बोरिंग माझ्या हिश्श्यात आहे” असे म्हणत पाणी भरण्यास मज्जाव केला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी आरोपी दिलीप मोहिते यांनी आपल्या हातातील लोखंडी पाईपने रवींद्र मोहिते यांच्या डोक्यात प्रहार केला.

याचवेळी अन्य आरोपी वैभव दिलीप मोहिते (वय २६) आणि दिपाली दिलीप मोहिते (वय ५५) यांनी फिर्यादीला दोन्ही हातांनी धरून ढकलाढकल केली आणि शिवीगाळ करत दमदाटी केली. या मारहाणीत रवींद्र मोहिते जखमी झाले असून, त्यांनी २ एप्रिल रोजी पहाटे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५२, ११५(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ९०/२०२६ नुसार नोंद केला असून अधिक तपास सुरू आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *