GRAMIN SEARCH BANNER

मंगला एक्सप्रेस अचानक थांबल्याने कोकण मार्गावर तासभर गोंधळ

Gramin Varta
243 Views

खेड / प्रतिनिधी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या मंगला एक्सप्रेसच्या इंजिनला देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी ठेवलेल्या साहित्याचा अडथळा निर्माण झाल्याने रविवारी सकाळी काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली. इंजिनमधून अचानक सायरनचा आवाज सुरू झाल्याने प्रवासी आणि रेल्वे यंत्रणांमध्ये धावपळ उडाली. ही घटना रविवारी सकाळी सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास दिवाणखवटी परिसरात घडली.

मुंबईहून कोकण मार्गावर येणारी मंगला एक्सप्रेस दिवाणखवटीजवळ पोहोचली असता इंजिनचे गार्ड देखभाल-दुरुस्तीच्या साहित्यामध्ये अडकल्याचे लोको पायलटच्या निदर्शनास आले. संभाव्य धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून एक्सप्रेस तातडीने थांबवण्यात आली. यावेळी सुरू झालेल्या सायरनमुळे डब्यांतील प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच कोकण रेल्वेच्या आपत्कालीन यंत्रणा सक्रिय झाल्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ कळवून अडकलेले इंजिनचे गार्ड बाजूला करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात आले. या कालावधीत कोकण मार्गावरील वाहतूक नियंत्रित करण्यात आली. परिणामी, 22476 क्रमांकाची हिसार एक्सप्रेस खेड रेल्वे स्थानकात सुमारे एक तास खोळंबली.

रविवारी ‘विकेंड’ असल्याने कोकण मार्गावरील बहुतांश रेल्वेगाड्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीने धावत होत्या. त्यातच काही गाड्यांच्या विस्कळीत वेळापत्रकामुळे प्रवाशांना अतिरिक्त गैरसोयीचा सामना करावा लागला. अखेर इंजिनला अडकलेले गार्ड सुरक्षितरीत्या काढून टाकल्यानंतर मंगला एक्सप्रेस पुन्हा मार्गस्थ झाली आणि मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

या घटनेमुळे काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली असली तरी अन्य रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झाला नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3375098
Share This Article