GRAMIN SEARCH BANNER

दापोलीतून चोरी झालेली इको कार अवघ्या २४ तासांत चिपळूणमध्ये हस्तगत; दापोली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Gramin Varta
251 Views

दापोली : दापोली येथील व्यापारी अनिल मोरे यांची चोरीला गेलेली चारचाकी गाडी शोधून काढण्यात दापोली आणि शिरगाव पोलिसांना अवघ्या २४ तासांत यश आले आहे. २९ मार्च रोजी दोन अज्ञात व्यक्तींनी ही इको कार चोरून नेली होती, ज्याबाबत दापोली पोलीस ठाण्यात तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुहागर-विजापूर मार्गावरील पोफळी तांबे कॅन्टीन या ठिकाणी अलोरे-शिरगाव पोलिसांना एक चारचाकी गाडी संशयास्पदरीत्या उभी असल्याचे दिसून आले. शिरगाव पोलिसांनी तातडीने याची माहिती दापोली पोलिसांना दिली.

घटनेची खातरजमा करण्यासाठी दापोली पोलिसांनी फिर्यादी अनिल मोरे यांना सोबत घेऊन शिरगाव पोलीस ठाणे गाठले. त्या ठिकाणी उभी असलेली गाडी आपलीच असल्याची खात्री मोरे यांनी केल्यानंतर पोलिसांनी रीतसर पंचनामा करून सदर गाडी त्यांच्या ताब्यात दिली. गुहागर-विजापूर मार्गावरील एका वळणावर ही गाडी सोडून चोरटे पसार झाले होते. चोरीची घटना घडल्यानंतर अवघ्या एका दिवसात तपास लावून गाडी मिळवून दिल्याबद्दल व्यापारी अनिल मोरे यांनी दापोली पोलिसांचे विशेष कौतुक करून आभार मानले आहेत. पोलिसांनी गाडी हस्तगत केली असली, तरी ही चोरी करणारे ते दोन अज्ञात इसम नेमके कोण होते आणि त्यांचा यामागचा उद्देश काय होता, याचा सखोल तपास दापोली पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे चोरट्यांचे धाबे दणाणले आहेत.

Total Visitor Counter

3391780
Share This Article