राजापूर: राजापूर शहर पाणीपुरवठा योजनेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या मौजे शीळ येथील जॅकवे आणि जलवाहिनी अंथरण्याच्या कामात निर्माण झालेला पेच अखेर आमदार किरण सामंत यांच्या पुढाकारामुळे सुटला आहे. या प्रलंबित कामाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत आमदारांनी स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात यशस्वी मध्यस्थी केली. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला आता गती मिळणार असून राजापूर शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
शीळ ता. राजापूर येथे जॅकवे उभारणे आणि जलवाहिनी टाकण्याच्या कामात काही स्थानिक तांत्रिक अडथळे आणि नागरिकांच्या समस्यांमुळे कामाला खिळ बसली होती. या प्रकल्पाचा थेट परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत असल्याने आमदार किरण सामंत यांनी या प्रकरणी विशेष लक्ष दिले. आढावा बैठकीदरम्यान त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या अडचणींचे गांभीर्य समजून घेत प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या तातडीने सोडवण्याच्या सूचना दिल्या. प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व घटकांनी समन्वय राखावा आणि स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच पुढची पावले उचलावीत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
आमदार सामंत यांच्या मध्यस्थीनंतर विविध विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन कामातील अडथळे दूर करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या प्रकल्पामुळे भविष्यात राजापूरकरांना नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे. बैठकीला तहसीलदार विकास गमरे, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, सभापती नंदनी कदम, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कुवळेकर, नगरसेवक जमीर खलपे यांच्यासह शीळ गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे शीळ ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून रखडलेल्या जलवाहिनीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.







