GRAMIN SEARCH BANNER

ताम्हिणी घाटात सहलीच्या बसला अपघात; २५ विद्यार्थी जखमी, मोठी दुर्घटना टळली

Gramin Varta
188 Views

रायगड : पुणे येथून रायगड जिल्ह्यातील काशिद येथे सहलीसाठी निघालेल्या इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या खासगी आराम बसला ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत बसमधील सुमारे २० ते २५ विद्यार्थी जखमी झाले असून, सर्वांना उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भोसरी (पुणे) येथून सकाळी साडेअकराच्या सुमारास ही बस निघाली होती. बसमध्ये सुमारे ५० विद्यार्थी होते. ताम्हिणी घाटातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डोंगराच्या खडकावर आदळली. अचानक झालेल्या अपघातामुळे बसमधील विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि अनेकजण घाबरून गेले.

अपघाताची माहिती मिळताच रवाळजे येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बसमधून बाहेर काढण्यात आले. जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

या अपघातात समोरून येणाऱ्या एका कारलाही बसने धडक दिली, त्यामुळे ती कार रस्त्यालगतच्या झाडीत जाऊन अडकली. सुदैवाने बस दरीत कोसळण्यापासून थोडक्यात वाचल्याने मोठी जीवितहानी टळली. दरम्यान, ताम्हिणी घाटात गेल्या तीन महिन्यांतील हा तिसरा अपघात असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Total Visitor Counter

3388221
Share This Article