खेड : नागरिकांच्या सुरक्षिततेस प्रभावी आणि तांत्रिक बळ देण्यासाठी राज्य शासनाच्या गृह विभागामार्फत खेड पोलिसांच्या ताफ्यात अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल करण्यात आली आहे. या व्हॅनमुळे सायबर गुन्हे उघडकीस आणणे, डिजिटल पुरावे संकलित करणे तसेच मोबाईल डेटाचे विश्लेषण अधिक जलद आणि अचूक पद्धतीने करता येणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते ही व्हॅन खेड पोलीस स्थानकास सुपूर्द करण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी राधिका फडके, शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये अत्याधुनिक सॉफ्टवेअर, डिजिटल एविडेन्स प्रोसेसिंग यंत्रणा, डेटा रिकव्हरी प्रणाली यांचा समावेश आहे. तसेच या सेवेकरिता प्रशिक्षित फॉरेन्सिक तज्ञांची नियुक्ती करण्यात आली असून त्यामुळे तपास प्रक्रियेला मोठी चालना मिळणार आहे.
खेड पोलिसांच्या ताफ्यात अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल





