GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: अंत्यविधीच्या वादातून स्मशानभूमीत तुफान मारहाण; चार जणांवर गुन्हा दाखल

Gramin Varta
418 Views

चिपळूण: मावशीच्या अंत्यविधीसाठी जमलेल्या एका तरुणाला स्मशानभूमीतच चार आरोपींनी शिवीगाळ करत, दगड मारून मारहाण केल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथे उघडकीस आली आहे. अंत्यसंस्कारासाठी काही नातेवाईक येत असताना त्यांच्यासाठी थांबायला सांगितल्याच्या क्षुल्लक कारणावरून हा वाद विकोपाला गेला. या मारहाणीत फिर्यादीच्या डोक्याला दगड लागून त्याला दुखापत झाली आहे. या प्रकरणी भारतीय न्यायसंहितेच्या (बीएनएस) संबंधित कलमांखाली चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळी खर्द येथील स्मशानभूमीत दि. ०२ डिसेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता कविता बाळ जाधव यांचा अंत्यविधी सुरू होता. या अंत्यविधीसाठी फिर्यादी प्रशांत पोपट चव्हाण (वय ३३, सध्या रा. आकले, ता. चिपळूण) हे उपस्थित होते. फिर्यादी चव्हाण यांचे आई-वडील आणि इतर काही नातेवाईक स्मशानभूमीत पोहोचायला थोडा विलंब होत होता. त्यामुळे चव्हाण यांनी तेथे जमलेल्या नातेवाईकांना नम्र विनंती केली की, “आई-वडील व इतर नातेवाईक येत आहेत, त्यांना पण दर्शन होऊ द्यावे, तोपर्यंत थोडा वेळ थांबा.”

मात्र, चव्हाण यांची ही विनंती किरण बाळ जाधव आणि मगट व्यंकट जाधव यांच्यासह तेथे जमलेल्या इतर नातेवाईकांना मान्य झाली नाही. त्यांनी थांबण्यास विरोध करत “थांबायचे नाही, अग्नी द्या” असे बोलून वाद घालण्यास सुरुवात केली.

या वादानंतर संतप्त झालेल्या किरण बाळ जाधव (सध्या रा. पिंपळी, मूळ रा. पाटण, जि. सातारा) आणि मगट व्यंकट जाधव (रा. तळदेव, जि. सातारा) यांनी प्रशांत चव्हाण यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करत असताना किरण बाळ जाधव याने तेथेच असलेला एक दगड उचलून थेट फिर्यादी प्रशांत चव्हाण यांच्या डोक्यात मारला.

याचवेळी, मगट व्यंकट जाधव, अविनाश मगट जाधव, आणि सौरभ सुनिल जाधव (सर्व रा. तळदेव, जि. सातारा) यांनी देखील प्रशांत चव्हाण यांना हाताच्या ठोशांनी पाठीत मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीदरम्यान आरोपींनी फिर्यादीला “तुला सोडणार नाही,” अशी गंभीर धमकी दिली.

या घटनेत प्रशांत पोपट चव्हाण (वय ३३) हे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांनी चिपळूण पोलिसांत  फिर्याद दाखल केली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी किरण बाळ जाधव, मगट व्यंकट जाधव, अविनाश मगट जाधव, आणि सौरभ सुनिल जाधव या चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्यायसंहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) च्या पुराव्यानुसार गु.आर. क्र. २७४/२०२५ अन्वये हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3368890
Share This Article