GRAMIN SEARCH BANNER

परशुराम घाटातील गॅबियन वॉल लगतची माती वाहून गेली; धोका वाढला

Gramin Search
6 Views

चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील नव्याने उभारलेल्या गॅबियन वॉलच्या लगतची माती जोरदार पावसामुळे वाहून गेल्याने ही भिंत आता धोकादायक बनली आहे. भिंत कोसळण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरवर्षी पावसाळ्यात परशुराम घाट राष्ट्रीय महामार्ग विभागासाठी डोकेदुखी ठरत असून, यंदाही केलेल्या उपाययोजना फोल ठरत असल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात परशुराम घाटात सातत्याने दरडी कोसळल्या होत्या. या पार्श्वभूमीवर उत्तराखंड येथील एका कंपनीला घाटाच्या सुरक्षिततेसाठी गॅबियन वॉल आणि वरच्या बाजूला लोखंडी जाळी लावण्याचे काम सोपवण्यात आले होते. यासाठी कोट्यवधी रुपयांची निविदा काढण्यात आली होती आणि उन्हाळ्याच्या दिवसांत गेले चार महिने हे काम युद्धपातळीवर सुरू होते. मात्र, अवकाळी पावसामुळे हे काम अर्धवटच राहिले.

घाटाच्या खाली बांधलेल्या गॅबियन वॉलची माती पहिल्याच अवकाळी पावसात वाहून गेली होती. आता पुन्हा एकदा जोरदार पाऊस आणि डोंगर उतारावरून येणाऱ्या पाण्यामुळे गॅबियन वॉललगतची माती मोठ्या प्रमाणावर वाहून गेली आहे, ज्यामुळे या भिंतीला गंभीर धोका निर्माण झाला आहे. सध्या तरी या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे, परंतु वाढता धोका लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Total Visitor Counter

2650586
Share This Article