GRAMIN SEARCH BANNER

पालखी घरी नेण्याचे तहसीलदारांचे आदेश धुडकावल्याप्रकरणी हातदे येथील पाच जणांवर गुन्हा

Gramin Varta
515 Views

राजापूर: तालुक्यातील हातदे येथे प्रशासनाने दिलेल्या आदेशाची अवज्ञा करून शिमगोत्सवाच्या पालखीवरून वाद घालणाऱ्या पाच जणांविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तहसीलदार कार्यालयाने दिलेल्या अधिकृत आदेशाचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, हातदे गावातील शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन गटांमधील वाद मिटवण्यासाठी राजापूरच्या तहसीलदारांनी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये एक विशेष आदेश जारी केला होता. या आदेशानुसार, गावातील दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे शिमगोत्सव साजरा करावा आणि ग्रामदेवतेची पालखी दुसऱ्या गटाच्या घरी नेण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.

मात्र, २ मार्च २०२६ पासून आजतागायत पहिल्या गटातील काही व्यक्तींनी या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केले.प्रशासकीय आदेशाचा मान न राखता उत्सवात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी मारुती संजय कोदले यांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी सुशील हरिश्चंद्र चव्हाण, मनोहर अनंत चव्हाण, शांताराम पर्शुराम चव्हाण, दिनानाथ तुकाराम चव्हाण आणि विजय दत्ताराम चव्हाण (सर्व राहणार हातदे, राजापूर) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवला आहे. लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा केल्याप्रकरणी ही कारवाई झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3199422
Share This Article