GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण : पिंपळी–खडपोली पुलाच्या पुनर्बांधणीसाठी अखेर निविदा जाहीर

Gramin Varta
137 Views

खडपोली एमआयडीसी परिसरातील जनतेला दिलासा

चिपळूण : पिंपळी–नांदिवसे रस्त्यावरील खचलेल्या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी तब्बल अडीच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) निविदा प्रक्रिया जाहीर केली आहे. या पुलासह कालव्यावरील पुलाचेही पुनर्बांधणीचे काम करण्यात येणार असून दोन्ही पुलांसाठी एकत्रित २९ कोटी २७ लाख ७९ हजार ९८२ रुपयांचा खर्च येणार आहे.

ऑगस्ट महिन्यात पिंपळी–खडपोली पूल खचल्याने खडपोली एमआयडीसीसह दसपटी परिसरातील गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. त्यामुळे विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक आणि ग्रामस्थांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. पर्यायी मार्ग म्हणून पेढांबे आणि शिरगावमार्गे मोठा वळसा घ्यावा लागत असल्याने वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत होता.

घटनेच्या दुसऱ्याच दिवशी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी पाहणी करून “पंधरा दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू होईल” असे आश्वासन दिले होते. त्यानंतर कोकण विभागाचे मुख्य अभियंता सचिन राक्षे यांनीही स्थळाची पाहणी केली.

दरम्यान, खचलेल्या पिंपळी पुलासह कालव्यावरील जुन्या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ४० ते ४५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर माती परीक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. त्या तांत्रिक अहवालानुसार अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून, अखेर एमआयडीसीने या दोन्ही पुलांच्या पुनर्बांधणीसाठी निविदा जाहीर केली आहे.

Total Visitor Counter

3366850
Share This Article