GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांचा एव्हरेस्ट मोहिमेसाठी सत्कार

Gramin Varta
39 Views

रत्नागिरी : अत्यंत प्रतिकूल हवामानाचा आणि खडतर मार्गाचा यशस्वी सामना करत समुद्रसपाटीपासून ५३६४ मीटर उंचीवर असलेली ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ मोहीम फत्ते करणारे रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांचा मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल पत्रकार परिषदेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

प्रशांत सातपुते यांनी दाखवलेले धाडस आणि मिळवलेले अद्वितीय यश रत्नागिरी जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. हाडे गोठवणाऱ्या थंडीत आणि अत्यंत दुर्गम परिस्थितीत त्यांनी ही मोहीम यशस्वी करून एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. या मोहिमेत प्रशांत सातपुते यांच्यासोबत डॉ. सौ. सुप्रिया सातपुते आणि रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांचाही समावेश होता.

प्रशांत सातपुते आणि त्यांचे सहकारी १५ मे रोजी नेपाळची राजधानी काठमांडू येथे दाखल झाले होते. जगातील सर्वात धोकादायक मानल्या जाणाऱ्या लुकला विमानतळापासून त्यांच्या प्रत्यक्ष ट्रेकिंगला सुरुवात झाली.

लुकला, फाकडिंग, नामचे बाजार, तेंगबोचे, दिंगबोचे, लोबुचे, गोरकक्षेप आणि अखेरीस एव्हरेस्ट बेस कॅम्प असा अत्यंत आव्हानात्मक प्रवास प्रशांत सातपुते यांनी टप्प्याटप्प्याने पूर्ण केला. २३ मे रोजी बेस कॅम्पवर भारताचा राष्ट्रध्वज फडकवून आणि संविधानाची उद्देशिका प्रदर्शित करून त्यांनी या मोहिमेची यशस्वी सांगता केली.

या मोहिमेदरम्यान प्रशांत सातपुते आणि त्यांच्या पथकाला रात्रीचे उणे १५ अंश सेल्सिअस, तर दिवसाचे ४ ते ६ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाचा सामना करावा लागला. विशेषतः लोबुचे ते बेस कॅम्प हा प्रवास अत्यंत खडतर आणि जीवघेणा होता. हाडे गोठवणारे थंड वारे आणि अत्यंत दुर्गम रस्ता यामुळे प्रशांत सातपुते यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची मोठी कसोटी लागली, मात्र खंबीर आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी या सर्व आव्हानांवर मात केली. या मोहिमेत नेपाळमधील ‘पीक १५ अडव्हेंचर’चे शेखर तमांग, योगेंद्र तमांग व प्रशांत तमांग यांनी स्थानिक मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली.

प्रशांत सातपुते यांच्या या यशाबद्दल आयोजित सत्कार समारंभाला राज्य उपाध्यक्ष हेमंत वणजू, मराठी पत्रकार परिषद जिल्हाध्यक्ष आनंद तापेकर, डिजिटल पत्रकार परिषद जिल्हा अध्यक्ष मुश्ताक खान, कार्याध्यक्ष राजेश शेळके, मनोज लेले, राकेश गुडेकर, जमीर खलफे, भालचंद्र नाचणकर, शोभना कांबळे, तन्मय दाते, शकील गवाणकर, कांचन मालगुंडकर, रहीम दलाल, राजन चव्हाण आणि सचिन बोरकर उपस्थित होते.

Total Visitor Counter

3483720
Share This Article