दिल्ली: अटलांटिक महासागरातील केप वर्डे जवळ अडकलेल्या क्रूझ जहाजावर हंटाव्हायरसचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. या जहाजावरील क्रू सदस्यांमध्ये दोन भारतीयांचाही समावेश आहे.
या जहाजावर हंटाव्हायरसचा प्रसार झाल्याची माहिती समोर आली असून आतापर्यंत पाच प्रकरणांची पुष्टी झाली आहे. यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. ओशनवाइड एक्सपेडिशन्स या कंपनीचे हे आलिशान क्रूझ जहाज १ एप्रिल रोजी उशुआइया येथून निघाले होते. हे जहाज १० मे रोजी कॅनरी आयलंड्स येथे पोहोचण्याची अपेक्षा आहे.
अहवालानुसार, १० एप्रिलला प्रवास सुरू होताना या लक्झरी क्रूझवर २८ देशांतील सुमारे १५० प्रवासी आणि क्रू सदस्य होते. मात्र, २४ एप्रिल रोजी अनेक प्रवासी सेंट हेलेना बेट येथे उतरले.
क्रूझवर असलेल्या २८ देशांतील लोकांमध्ये ३८ जण फिलिपिन्समधील, ३१ युनायटेड किंगडममधील, २३ अमेरिका, १६ नेदरलँड्स, १४ स्पेन, नऊ जर्मनी, सहा कॅनडा आणि दोन क्रू सदस्य भारतातील असल्याचे सांगण्यात आले आहे.
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ ) ने गुरुवारी हंटाव्हायरसच्या आठ संशयित रुग्णांपैकी पाच प्रकरणांची पुष्टी केली. हंटाव्हायरसमुळे ६९ वर्षीय डच महिलेचा मृत्यू झाला असून त्यांना या विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्या डच पतीचा आणि एका जर्मन महिलेचाही मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेने स्पष्ट केले की, या विषाणूचा प्रसार हा कोणत्याही नव्या महामारीची सुरुवात नाही.
डब्ल्यूएचओमधील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सध्याची परिस्थिती सहा वर्षांपूर्वीच्या कोविड-१९ सारखी नाही, कारण हंटाव्हायरस हा जवळच्या आणि थेट संपर्कातून पसरतो. व्हॅन केरखोव्ह म्हणाल्या, “हा कोविड नाही, हा इन्फ्लूएंझाही नाही. हा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने पसरतो.” अधिकाऱ्यांनी एमव्ही होंडियस वरील सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. डब्ल्यूएचओ ने सांगितले की, हंटाव्हायरस सामान्यतः उंदीरांसारख्या प्राण्यांमधून पसरतो. मात्र, या प्रादुर्भावात प्रथमच हा विषाणू माणसाकडून माणसाकडेही पसरण्याची शक्यता दिसून आली आहे.






