GRAMIN SEARCH BANNER

बनावट कागदपत्रांआधारे आलिशान वाहनांची विक्री करणारी अखेर टोळी जेरबंद

रत्नागिरीतील दोघांचा समावेश

कोल्हापूर : बनावट कागदपत्रांआधारे आलिशान मोटारींची परस्पर विक्री करणार्‍या आंतरजिल्हा टोळीला शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. मुंबईसह बीड, रत्नागिरी, भिवंडी येथे पथकाने छापेमारी करून बनावट आर.सी. बुक तयार करणार्‍या यंत्रसामग्रीसह प्रिंटर, वेगवेगळ्या वाहनांच्या नंबर प्लेट व अन्य कागदपत्रे हस्तगत केली.

संशयिताकडून 59 लाख 70 हजार किमतीच्या तीन आलिशान मोटारी जप्त केल्या.

नीलेश रामचंद्र सुर्वे (वय 33, रा. खेर्डी, ता. चिपळूण, रत्नागिरी), हसन मगदूम जहाँगीरदार (31, कारवांचीवाडी, जि. रत्नागिरी), मोहम्मद अमजद मोहम्मद अहसान कुरेशी (43, जोगेश्वरी वेस्ट, मुंबई), सकिब सलीम शेख (29, महापोली, ता. भिवंडी, ठाणे), आरटीओ एजंट शहजामा खान बदरजमा खान (36, हत्तीखाना, जुना बाजार, बिड), शेख शाहनवाज शेख असिफ (45, नगर रोड, बिड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संशयितांना न्यायालयाने दि. 5 जुलैअखेर पोलिस कोठडी दिली आहे.

फिर्यादी सागर हरी देसाई (38, सुदर्शन कॉलनी, टेंबलाईवाडी) यांचा न्यू शाहूपुरी येथे वाहन विक्रीचा व्यवसाय आहे. एप्रिल ते मे 2024 या काळात संशयित संजय दत्तात्रय हावलदार (रा. कळंबा, ता. करवीर), नीलेश सुर्वे, हसन मगदूम यांनी देसाई यांना चार आलिशान मोटारी 72 लाख 25 हजार रुपयांना विक्री करून देतो, असे सांगून दोन लाख रुपये अ‍ॅडव्हान्स देत विश्वास संपादन केला. चारही मोटारींचा संशयितांनी ताबा घेतला. बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर मोटारींची विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीला आल्यानंतर देसाई यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

पोलिसांनी सुर्वे, जहाँगीरदार यांना ताब्यात घेतले असता टीटी फॉर्मवर फिर्यादी यांच्या बनावट स्वाक्षर्‍या करून मुंबई, ताडदेव आरटीओ कार्यालयातील एजंट कुरेशी याच्याकडून प्रत्येकी मोटारीमागे 25 हजार रुपये घेवून बनावट आरसी बुक तयार करून व्यवहार केल्याचे उघडकीला आले. चौकशीत भिवंडी येथील सकिब शेख याचे नाव निष्पन्न झाले. आरसी बुक त्याच्याकडून तयार केल्याची माहिती मिळाली.

पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह पथकाने बीड येथील शहजामा खान याला ताब्यात घेतले. चौकशीत शेख आसिफ याच्याकडून बनावट आरसी बुक तयार करून घेतल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याच्या घराची झडती घेतली. प्लास्टिकच्या बॉक्समध्ये 87 कोरे पीयूसी कार्ड, 47 आरसी बुक, वेगवेगळ्या मोटारींचे नंबरप्लेट, 31 अर्धवट बनविलेले आरसी बुक, प्रिंटर, सीपीयू, मॉनिटर, कलर रिबिन रोल, कॉर्ड प्रिंटर अशी यंत्रसामग्री हस्तगत करण्यात आल्याचेही डोके यांनी सांगितले.

Total Visitor

0217472
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *