चिपळूण : शहरातील भेंडी नाका परिसरात मंगळवारी सकाळी बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्या अल्पवयीन युवकास नगर परिषदेच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी संबंधित दुकानदारावर दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक सुजित जाधव यांनी केली. यावेळी सुमारे एक किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
शहरात प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी नगर परिषद सातत्याने कारवाई करत आहे. मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी नियमित गस्त व पाहणी करत आहेत.
मंगळवारी सकाळी गस्तीवर असताना भेंडी नाका परिसरात एक अल्पवयीन युवक सायकलवरून भाजी विकणाऱ्या महिलांना प्लास्टिक पिशव्या विक्री करत असल्याचे जाधव यांच्या निदर्शनास आले. चौकशी केली असता, सदर प्लास्टिक पिशव्या ‘सुर्वे’ नावाच्या दुकानदाराकडून आणल्याचे त्याने सांगितले.
त्यानंतर संबंधित दुकानाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान बंदी असलेले प्लास्टिक आढळून आल्याने दुकानदारावर दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
या कारवाईनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून, बंदी असलेले प्लास्टिक अनधिकृतपणे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी आपल्याकडील प्लास्टिक साहित्य तातडीने हटवले असल्याची चर्चा आहे.
चिपळुणात प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्याला पकडले; दुकानदारास दोन हजाराचा दंड







