GRAMIN SEARCH BANNER

राजापुरात डिझेलची धोकादायक वाहतूक करणाऱ्या पिकअप चालकावर कारवाई

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर उड्डाणपुलाजवळील सीएनजी पंपाजवळ अत्यंत निष्काळजीपणे आणि हयगयीने डिझेलची वाहतूक करणाऱ्या एका पिकअप चालकावर राजापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. मानवी जीवन धोक्यात येईल अशा पद्धतीने ज्वालाग्राही पदार्थाची वाहतूक केल्याप्रकरणी संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन रामचंद्र घोगले यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रकाश रूपसिंग जाधव (वय ३१, मूळ रा. विजापूर, कर्नाटक, सध्या रा. तळेरे, कणकवली) हा आपल्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप (क्रमांक के.ए.२८.सी.४६६१) मधून डिझेलची वाहतूक करत होता. ही वाहतूक करताना ज्वालाग्राही पदार्थाबाबत घ्यायची आवश्यक काळजी न घेता, अत्यंत निष्काळजीपणे ही कृती केली जात होती. यामुळे परिसरात मोठी दुर्घटना घडून कोणालाही इजा किंवा क्षती पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली होती.

धोकादायक पद्धतीने ही वाहतूक होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी वाहन अडवून ही कारवाई केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता (BNS) कलम २८७ अन्वये गुन्हा क्रमांक ०९/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगीसारख्या धोक्याबाबत किंवा ज्वालाग्राही पदार्थाबाबत निष्काळजीपणाने वर्तन केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. महामार्गावर अशा प्रकारे धोकादायक वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची नजर असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

Total Visitor Counter

3483515
Share This Article