GRAMIN SEARCH BANNER

गुहागर : गिमवी येथे रानडुकराची शिकार; बंदूक आणि टेम्पोसह तिघांना वनविभागाने घेतले ताब्यात

Gramin Varta
139 Views

गुहागर: तालुक्यातील गिमवी परिसरात रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी चिपळूण वनविभागाने मोठी कारवाई करत तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. सोमवार, २३ मार्च रोजी करण्यात आलेल्या या धडक कारवाईत एक विना क्रमांकाचा ४०७ टेम्पो, शिकारीसाठी वापरलेली बंदूक आणि मृतावस्थेतील रानडुक्कर जप्त करण्यात आले असून, या घटनेमुळे गुहागर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गिमवी गावच्या हद्दीत एक विना क्रमांकाचा ४०७ टेम्पो संशयास्पद स्थितीत उभा असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्याआधारे वनविभागाच्या पथकाने या वाहनाची झडती घेतली असता, टेम्पोच्या हौद्यात एका मोठ्या रानडुकराची शिकार करून त्याला ठार मारलेल्या अवस्थेत ठेवल्याचे आढळून आले. तसेच याच वाहनामध्ये शिकार करण्यासाठी वापरण्यात आलेली एक १२ बोअरची डबल बॅरल बंदूकही पोलिसांना मिळून आली. याप्रकरणी घटनास्थळावरून प्रसाद सुभाष सोमण, रोशन रमेश मोरे आणि संदीप वसंत गावडे (सर्व रा. गिमवी, ता. गुहागर) या तिघांना वनविभागाने ताब्यात घेतले आहे.

या संशयितांविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. ही यशस्वी कारवाई रत्नागिरी (चिपळूण) विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई-पाटील आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणचे वन परिक्षेत्र अधिकारी सरवर खान, गुहागरचे वनपाल अमित निमकर, एस. एस. सावंत, सिद्धेश्वर गायकवाड, अरविंद मांडवकर, कुमार पवार, राहुल गुंठे आणि कृष्णा इरमले यांच्या पथकाने केली. वनविभागाच्या या कडक कारवाईमुळे अवैध शिकार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Total Visitor Counter

3203464
Share This Article