GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीतील ‘डुन्नु’ लघुपटाची आंतराष्ट्रीय स्तरावर झेप

Gramin Varta
202 Views

रत्नागिरी : आयएफपी लघुपट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रत्नागिरीचा लास्ट टेबल प्रॉडक्शन निर्मित ‘डुन्नु’ या लघुपटाने अभूतपूर्व यश मिळवत रौप्य पदक पटकावले आहे. या यशाने रत्नागिरीचा झेंडा जगभरात अभिमानाने फडकला असून, स्थानिक कलाकरांच्या मेहनतीला सुवर्णमोल गवसले आहे.

या स्पर्धेत तब्बल २३ देशांतील ३५० शहरांमधून ४० हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. एवढ्या प्रचंड स्पर्धकांना मागे टाकत ‘डुन्नु’ने द्वितीय क्रमांक पटकावला आणि आशिया खंडातील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत इतिहास रचला.

मिशन ५० तासांची थरारक मोहीम

आयएफपी ही आशिया खंडातील सर्वात मोठी, अत्यंत आव्हानात्मक आणि वेळेशी झुंज देणारी कंटेंट फेस्टिव्हल स्पर्धा म्हणून प्रसिद्ध आहे. स्पर्धेचा विषय जाहीर होताच पुढील ५० तासांच्या आत संपूर्ण लघुपट तयार करून सादर करणे बंधनकारक असते.

या ५० तासांत स्क्रिप्टिंग, शूटिंग, एडिटिंग, डबिंग या सर्व टप्प्यांतून मार्ग काढत ‘डुन्नु’ टीमने जिद्द, सर्जनशीलता आणि अचूक वेळ व्यवस्थापन दाखवत अवघड परीक्षेत बाजी मारली.

बॉलिवूडच्या तारकांच्या साक्षीने गौरव

या आंतरराष्ट्रीय यशाचा भव्य पुरस्कार सोहळा मुंबईतील नामांकित मेहबूब स्टुडिओ येथे झाला. बॉलिवूडचे अभिषेक बच्चन, शाहिद कपूर, नवाजुद्दीन सिद्दीकी, अनन्या पांडे तसेच दिग्दर्शक अनुराग बासू, अनुभव सिन्हा आणि रवी जाधव यांसारख्या सिनेजगतातील दिग्गजांच्या उपस्थितीत रत्नागिरीच्या कलाकारांना गौरवण्यात आले.

रत्नागिरीच्या सर्जनशील क्षमतेला जागतिक पातळीवर मिळालेला हा सन्मान स्थानिक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

Total Visitor Counter

3368332
Share This Article