GRAMIN SEARCH BANNER

‘नॅशनल क्रश’च्या टॅगमुळे जाहिरातींची कामं हिरावली; अभिनेत्री गिरिजा ओकने व्यक्त केली खंत

मुंबई: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री गिरिजा ओक सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. काही काळापूर्वी सोशल मीडियावर गिरिजाचे काही फोटो प्रचंड व्हायरल झाले होते, ज्यानंतर तिला नेटकऱ्यांनी ‘नॅशनल क्रश’ हा किताब दिला होता. या टॅगमुळे गिरिजाच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली असली, तरी व्यावसायिक स्तरावर मात्र तिला याचा फटका बसल्याचे समोर आले आहे. नॅशनल क्रश या टॅगमुळे आपल्या हातातील जाहिरातींची अनेक कामे गेल्याची खंत गिरिजाने नुकतीच एका मुलाखतीत व्यक्त केली आहे.

नॅशनल क्रश म्हणून ओळख मिळाल्यानंतर अनेकांना असे वाटले होते की गिरिजाला मोठ्या प्रमाणावर नवीन कामं मिळतील, परंतु वास्तव याच्या अगदी उलट असल्याचे तिने सांगितले. जाहिरात क्षेत्रातील गणितांचा उलगडा करताना गिरिजा म्हणाली की, जाहिरातींमध्ये अशा चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाते जे फार नवीन नसतात, पण खूप प्रसिद्धही नसतात. जेव्हा एखादा कलाकार अचानक खूप प्रसिद्ध होतो आणि त्याला जगभरात ओळखले जाऊ लागते, तेव्हा तो सर्वसामान्य घरातील चेहरा वाटत नाही. नेमकी हीच बाब गिरिजाच्या बाबतीत घडली. आतापर्यंत शंभरहून अधिक जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या गिरिजाला या नवीन टॅगमुळे जाहिरात विश्वातून मिळणारी विचारणा कमी झाली आहे.

या अनुभवाबद्दल अधिक बोलताना गिरिजाने सांगितले की, नॅशनल क्रश झाल्याचा एक मोठा फायदा म्हणजे तिच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढली. इतकेच नाही तर यामुळे ती मोठ्या प्रमाणावर अमराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. ज्या प्रेक्षकांनी तिचे मराठी चित्रपट पाहिले नव्हते, त्यांनी या टॅगमुळे तिचे जुने काम शोधून पाहिले, ही तिच्यासाठी आनंदाची बाब ठरली. मात्र, या टॅगकडे दुर्लक्ष केले तरी लोकांकडून प्रतिक्रिया येतात आणि त्याला जास्त महत्त्व दिले तरी लोक टीका करतात, असा मजेदार पण विसंगत अनुभवही तिने यावेळी मांडला. प्रसिद्धीच्या शिखरावर असूनही एका विशिष्ट टॅगमुळे कामावर झालेला हा परिणाम सध्या मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरत आहे.

Total Visitor Counter

3473101
Share This Article