राजापूर: श्री देव धूपपोश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनाला अपघात

Gramin Varta
2 Min Read

राजापूर : तालुक्यातील प्रसिद्ध श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने  एका भाविकाची मोटार रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात अडकली.

त्यामुळे श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

राजापूर शहराला लागूनच असलेल्या श्री देव धूतपापेश्वर मंदिराची ख्याती संपूर्ण राज्यात पसरलेली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात. शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून या मंदिराचे जतन आणि सुशोभीकरण केले आहे. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. परिणामी मागील एक-दोन वर्षांपासून भाविकांसह पर्यटकांचा ओढा वाढला आहे. मात्र राजापूर शहरातून मंदिराकडे जाणारा रस्ता हा फार अरुंद व तीव्र उताराचा आहे. त्यामुळे दोन गाड्या समोरासमोर आल्या की एकमेकाला बाजू देताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. या मार्गावरून प्रवास करताना भाविकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. अशातच बाहेरून येणाऱ्या भाविकांना गणेश मंदिरासमोरील अरुंद रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघात होत आहेत.

सध्या श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे पर्यटकांचा ओढा वाढलेला असून सातत्याने पर्यटकांची गर्दी होत आहे .मात्र अरुंद रस्त्यामुळे मंदिरापासून जवळपास एक किलोमीटर लांब गाड्या उभ्या करून भाविकांना चालत मंदिर गाठाव लागले होते. त्यामुळे श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. श्री गणेश मंदिराजवळ असणाऱ्या गटाराजवळ सातत्याने अरुंद रस्त्याचा आणि तीव्र उताराच्या रस्त्यामुळे बाहेरून येणाऱ्या भाविकांना रस्त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे छोटे-मोठे अपघातही घडत आहेत.

आज अशाच प्रकारे गणेश मंदिराजवळ रस्त्याचा अंदाज न आल्याने एका भाविकाची मोटार गटारात कलंडली. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र गाडीचे काही अंशी नुकसान झाले आहे. अन्य भाविक व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मोटार रस्त्यावर काढण्यात आली.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *