GRAMIN SEARCH BANNER

कोदवलीच्या शंकरेश्वर मंदिरातील नोंदींतून उलगडला राजापूरच्या किनारी प्रशासनाचा इतिहास

Gramin Varta
120 Views

राजापूर : तालुक्यातील कोदवली येथील प्राचीन श्री शंकरेश्वर महादेव मंदिर परिसरात आढळून आलेल्या तीन ऐतिहासिक शिलालेखांमुळे मराठा उत्तरकालीन धार्मिक परंपरा, स्थानिक प्रशासन व्यवस्था आणि समुद्रावरील कर व बंदर कारभार पाहणाऱ्या बोरवणकर घराण्याच्या कार्याचा महत्त्वपूर्ण इतिहास प्रकाशात आला आहे.

या शिलालेखांचा अभ्यास इतिहास संशोधक विनोद मनोहर पवार यांनी केला असून त्यांचे वाचन अनिल किसन दुधाणे यांनी केले आहे. मंदिराचे प्रवेशद्वार, गोमुख कुंड परिसर आणि सभामंडपातील भिंतींवर कोरलेले हे शिलालेख शालिवाहन शक १७६६ ते १७६७ अर्थात सन १८४४ ते १८४५ या काळातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे या तिन्ही लेखांत चिमणाजी हाणमाजी बोरवणकर यांचा उल्लेख “पतकी बंदरनिस राजापूर” किंवा “पतकी बंदर” असा आढळतो. इतिहास अभ्यासकांच्या मते हा उल्लेख समुद्रावरील करवसुली, बंदर प्रशासन किंवा किनारी व्यापार व्यवस्थापनाशी संबंधित पद दर्शवितो.

पहिल्या शिलालेखात श्री शंकरेश्वर देवालयाचे मूळ बांधकाम सिद्धेश्वर बाबा गोसावी यांनी केले असल्याची नोंद आहे. कालांतराने मंदिर जीर्ण झाल्यानंतर चिमणाजी हाणमाजी बोरवणकर यांनी त्याचा जीर्णोद्धार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. हा जीर्णोद्धार शके १७६६, क्रोधी संवत्सर, माघ शुद्ध दशमी, रविवार या मुहूर्तावर म्हणजेच १६ फेब्रुवारी १८४५ रोजी पूर्ण झाल्याचे लेखातून स्पष्ट होते.

दुसरा शिलालेख मंदिराबाहेरील गोमुख कुंडाकडे जाणाऱ्या पायऱ्यांजवळ आढळतो. त्यातही श्री शंकरेश्वरांच्या चरणी समर्पित जीर्णोद्धाराचे कार्य चिमणाजी हाणमाजी बोरवणकर यांनी केल्याची नोंद असून हा लेख २६ डिसेंबर १८४४ रोजी कोरल्याचे अभ्यासातून समोर आले आहे.

तिसऱ्या शिलालेखात “श्री शंकरेश्वर चरणी तत्पर” असा उल्लेख करून बोरवणकर घराण्याच्या भक्तिभावाचे दर्शन घडते. यात “हस्ते वामनाजी आबाजी बोरवणकर साष्टांग प्रणाम” अशी भावपूर्ण नोंदही करण्यात आली आहे. हा लेख शके १७६७, श्रावण शुद्ध पंचमी, शुक्रवार म्हणजेच ८ ऑगस्ट १८४५ रोजी कोरल्याचे स्पष्ट झाले आहे. लेखामध्ये तिथी, वार, नक्षत्र, पळे आणि कलाक अशा सूक्ष्म कालमापन घटकांची अचूक नोंद आढळते. यावरून त्या काळातील पंचांगविद्या आणि ज्योतिषशास्त्र किती विकसित होते याचा प्रत्यय येतो.

या शिलालेखांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तत्कालीन धार्मिक आणि सामाजिक जीवनाचा मिळणारा संदर्भ. भगवान शंकरांविषयी असलेली भक्ती, मंदिर जीर्णोद्धाराची परंपरा, मुहूर्ताचे महत्त्व आणि प्रतिष्ठित घराण्यांचे धार्मिक योगदान या सर्व गोष्टी या लेखांमधून स्पष्ट होतात. तसेच “बंदरनिस” किंवा “पतकी बंदर” या उल्लेखांमुळे राजापूर परिसरातील किनारी व्यापार आणि बंदर प्रशासनाची ऐतिहासिक पार्श्वभूमीही पुढे येत आहे.

इतिहास संशोधकांच्या मते हे शिलालेख केवळ धार्मिक नोंदी नसून मराठा उत्तरकालीन सामाजिक रचना, स्थानिक प्रशासन, समुद्री व्यापार व्यवस्था आणि सांस्कृतिक वारसा यांचे महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहेत. त्यामुळे या शिलालेखांचे संवर्धन, शास्त्रीय दस्तऐवजीकरण आणि पुरातत्त्वीय संरक्षण होणे आवश्यक असल्याची मागणी इतिहासप्रेमींमधून व्यक्त होत आहे.

कोदवली येथील श्री शंकरेश्वर मंदिर परिसरातील हे शिलालेख भविष्यातील संशोधनासाठी महत्त्वाचे स्रोत ठरणार असून राजापूरच्या इतिहासातील विस्मृतीत गेलेले अनेक संदर्भ उलगडण्याची शक्यता आहे.

Total Visitor Counter

3484458
Share This Article