GRAMIN SEARCH BANNER

देवगडमध्ये घरासमोरील कंपाऊंडमध्ये गांजाची लागवड; एकाला अटक, ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
152 Views

सावंतवाडी : देवगड तालुक्यातील कोटकामते आडिवरेवाडी येथे आपल्या घरासमोरील कंपाऊंडमध्ये अवैध गांजा पिकाची लागवड केल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. ओंकार कोतेकर (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

ही कारवाई शुक्रवारी, २९ मे रोजी करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे ४९ हजार रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंदे व अमली पदार्थांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी दिले आहेत. त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे देवगड पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. पोलिसांनी छापा टाकून संशयित ओंकार कोतेकर याच्या ताब्यातून सुमारे २ किलो ४५० ग्रॅम वजनाची, ताजी, ओलसर आणि उग्र वासाची गांजाची २३ झाडे जप्त केली. या जप्त केलेल्या ३ ते ५ फूट उंचीच्या झाडांची किंमत सुमारे ४९ हजार रुपये आहे.

याप्रकरणी संशयिताविरुद्ध देवगड पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायदा १९८५ चे कलम ८ (क), २० (ब), २ (ब) नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, कणकवलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली देवगडचे पोलीस निरीक्षक शाम बुवा, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3485068
Share This Article