रत्नागिरी: आगरनरळ पाचाडी रस्त्यावर भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा मृत्यू, तरुण गंभीर जखमी

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read
Car hit scene, male person lying on the floor in front of a car

जयगड: भरधाव वेगाने दुचाकी चालवणे एका तरुणाच्या जिवावर बेतल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी तालुक्यातील आगरनरळ फाटा ते भोईवाडी दरम्यानच्या पाचाडी रस्त्यावर घडली आहे. दुचाकी रस्त्याशेजारील गटारात कोसळून झालेल्या या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, त्याच्यासोबत असलेला अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. पंकज विश्वास यादव (वय ३३, रा. चवे बौद्धवाडी, रत्नागिरी) असे अपघातात मृत पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून, प्रथमेश प्रकाश पवार (वय ३१, रा. देवूड बौद्धवाडी) असे जखमीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास पंकज यादव हा आपली टीव्हीएस एन्ट्रॉक मोटारसायकल (क्रमांक एमएच ०८ बीजे १२७५) वरून प्रथमेश पवार याला पाठीमागे बसवून खंडाळ्याकडून चवे गावाच्या दिशेने जात होता. आगरनरळ पाचाडी परिसरात आले असता, रस्त्याच्या स्थितीचा अंदाज न घेता पंकजने दुचाकी अत्यंत भरधाव वेगाने आणि अविचाराने चालवली. यावेळी दुचाकीवरून ताबा सुटल्याने गाडी विरुद्ध दिशेला (राँग साईड) जाऊन रस्त्यालगत असलेल्या गटारात जोरदार आदळली.

हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर दुखापत झाल्यामुळे पंकज यादव याचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला प्रथमेश पवार हा गंभीर जखमी झाला आहे.या अपघातात दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी जयगड सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवाल्दार मिलिंद भार्गव कदम यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी मयत चालक पंकज यादव याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या विविध कलमांसह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ९ एप्रिल रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास या घटनेची अधिकृत नोंद करण्यात आली असून जयगड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *