सावर्डे कोंडमळा येथे उभी असलेल्या इर्टिगा कारला मद्यधुंद टेम्पो चालकाची धडक; दोन प्रवासी जखमी

saurabhsalvi26@gmail.com
2 Min Read

सावर्डे: मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील सावर्डे कोंडमळा येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अर्टिगा कारला पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव टेम्पोने जोरदार धडक दिली. हा अपघात ३ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडला असून, यामध्ये कारमधील दोन प्रवासी जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे टेम्पो चालकाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून हा अपघात केल्याचे समोर आले असून, याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विद्या तेजस गायकवाड (वय २६, रा. मुंबई) यांचे पती तेजस गायकवाड हे आपल्या मालकीची अर्टिगा कार (क्रमांक एम.एच. ०१ बी.वाय. ०२९९) घेऊन मुंबईच्या दिशेने जात होते. सावर्डे कोंडमळा येथे लघुशंकेसाठी त्यांनी आपली कार रस्त्याच्या कडेला पार्किंग लाईट लावून सुरक्षितरीत्या उभी केली होती. दरम्यान, गोवा बाजूकडून येणाऱ्या टेम्पो (क्रमांक एम.एच. ०७ ए.जे. ६४७९) वरील चालक सिद्धेश शिंगरे याने दारूचे सेवन करून आपले वाहन भरधाव वेगात आणि हयगयीने चालवत उभ्या असलेल्या अर्टिगा कारला पाठीमागून जोराची धडक दिली.

या भीषण धडकेत कारमधील दोन प्रवासी जखमी झाले असून कारचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातानंतर या प्रकरणाची तक्रार ९ एप्रिल रोजी सावर्डे पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी आरोपी टेम्पो चालक सिद्धेश शिंगरे याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सावर्डे पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *