चिपळूण: कुंभार्ली घाटातील एका वळणावर भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने एका कारला धडक दिल्याची घटना शनिवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील दोघांना दुखापत झाली असून, धडक दिल्यानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मोहम्मद जियाद विलायत खान (२०, रा. बहाद्दुरशेख नाका) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद खान आपली कार घेऊन कुंभार्ली घाटात फिरण्यासाठी गेले होते. घाटमार्गे ते चिपळूणच्या दिशेने परत येत असताना, पुंभार्ली घाटातील एका वळणावर समोरून भरधाव वेगात आलेल्या एका ट्रकने विरुद्ध दिशेने येऊन त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.
या धडकेत मोहम्मद खान यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या नेहा यादव (रा. चिपळूण) या दोघी जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर ट्रकचालक न थांबता आपल्या वाहनासह पळून गेला. जखमींना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले असून, या अपघाताप्रकरणी फरार ट्रकचालकाचा शोध अलोरे-शिरगाव पोलीस करत आहेत.