GRAMIN SEARCH BANNER

रेल्वे ट्रॅकजवळ आढळला नेपाळी तरुणाचा मृतदेह

Gramin Varta
731 Views

संगमेश्वर : आडवली (लांजा) रेल्वे मार्गावरील परिसरात रेल्वे ट्रॅकच्या लगत गटारात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने रविवारी परिसरात खळबळ उडाली. सदर तरुण अंदाजे २५ वर्षांचा असून तो नेपाळी नागरिक असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

रविवारी सकाळी सुमारे ७.४५ वाजता ही घटना उघडकीस आली. मृत तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली असून कवटी फुटून मेंदू बाहेर आल्याचे दिसून येत असल्याने त्याचा मृत्यू कसा झाला, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील दीपक लक्ष्मण कांबळे यांनी साखरपा पोलीस ठाण्याला कळवले. त्यानंतर साखरपा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय करंडे व पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील कांबळे यांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाची पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे.

मृताच्या खिशात एक चेकबुक सापडले असून त्यावर ‘लक्ष्मी गिरी साम दिलमया गिरी’ असे नाव नमूद आहे. मात्र मृत व्यक्तीचे निश्चित नाव व ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. देवरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांनीही घटनास्थळी भेट देत तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत.

मृत तरुणाची उंची सुमारे पाच फूट पाच इंच असून रंग गोरा आहे. त्याने जीन्स पॅन्ट व काळ्या रंगाचा फुल शर्ट घातलेला होता. जिल्ह्यात कामासाठी आलेल्या नेपाळी नागरिकांबाबत माहिती असलेल्या ठेकेदारांनी किंवा नागरिकांनी ओळख पटविण्यासाठी साखरपा किंवा देवरुख पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3370255
Share This Article