GRAMIN SEARCH BANNER

राजापूर: कत्तलीसाठी नेली जाणारी गुरे पकडली; 3 बैलांसह मुद्देमाल जप्त

Gramin Varta
364 Views

राजापूर: मुंबई-गोवा महामार्गावरील नेरकेवाडी येथे कत्तलीच्या उद्देशाने बैलांची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर राजापूर पोलिसांनी सोमवारी दुपारी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख ६० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह तीन बैलांची सुटका केली असून, याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, १६ मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास नेरकेवाडी परिसरातून एक महिंद्रा मॅक्सिमो गाडी (क्र. एम.एच.०४.एफ.डी.२४१६) संशयास्पदरीत्या जात होती. या गाडीचा हौदा काळ्या-पिवळ्या ताडपत्रीने झाकलेला होता. पोलीस तपासात या वाहनामध्ये तीन गावठी जातीचे बैल अत्यंत क्रूरपणे दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. या जनावरांना चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता, त्यांना वेदना होतील अशा पद्धतीने दाटीवाटीने कोंडून त्यांची वाहतूक केली जात होती. हे बैल कत्तलीसाठी नेले जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अक्षय सुनील घुमे यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी आरोपी चंद्रकांत महादेव कुळे (रा. कोनवेड, राजापूर) आणि तबरेज चांदमियॉन ठाकूर (रा. परटवली, राजापूर) यांच्यासह एका अन्य इसमावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३, प्राणी संरक्षण अधिनियम १९७६, प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम १९६० आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी या कारवाईत ३ लाख रुपये किमतीचे वाहन आणि प्रत्येकी २० हजार रुपये किमतीचे तीन बैल, असा एकूण ३ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुटका करण्यात आलेल्या बैलांमध्ये सुमारे ७ वर्षे वयोगटातील एक तांबूस आणि दोन काळ्या रंगाच्या बैलांचा समावेश आहे. या घटनेचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3367351
Share This Article