कर्दे समुद्रकिनारी बेशुद्धावस्थेत सापडलेल्या तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read
A shot in the morgue

दापोली: तालुक्यातील कर्दे समुद्रकिनारी वाळूमध्ये बेशुद्धावस्थेत सापडलेल्या एका ३५ वर्षीय तरुणाचा उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. संदीप गोपाळ कुंबेटे (रा. कर्दे, खांबेवाडी, ता. दापोली) असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संदीप कुंबेटे याला दारू पिण्याचे मोठे व्यसन होते. १० मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास तो कर्दे समुद्रकिनारी वाळूमध्ये बेशुद्धावस्थेत पडलेला स्थानिक ग्रामस्थांना दिसून आला. त्याच्या शरीराची काही प्रमाणात हालचाल होत असल्याचे लक्षात आल्यानंतर, त्याचा भाऊ भालचंद्र गोपाळ कुंबेटे यांनी त्याला तातडीने रुग्णवाहिकेने उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासून दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.या घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या एमएलसीवरून ११ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री दापोली पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दारूच्या व्यसनामुळेच हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *