संगमेश्वर – गुरुवारी संध्याकाळी सुमारे सहा वाजता येथील खालची गुरवावाडी परिसरात लागलेल्या आगीत एक गोठा पूर्णतः जळून खाक झाला. या आगीत कृषी साहित्य, यंत्रसामग्री आणि इतर अवजारे जळून सुमारे पाच लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले.
गोठ्याचे मालक लक्ष्मीकांत शंकर गाताडे हे शेती व वेल्डिंगचा व्यवसाय करतात. घरासमोरील या पक्क्या गोठ्यात त्या वेळी जनावरे नसून शेतीसाठी लागणारी यंत्रसामग्री ठेवलेली होती. अचानक लागलेल्या आगीत नव्याने खरेदी केलेली १२५ सीसी शाईन दुचाकी, ७.५ एचपी पॉवर टिलर, दोन ग्रास कटर, एअर कॉम्प्रेसर, वेल्डिंग मशीन, ५०० लिटरच्या तीन पाण्याच्या टाक्या, तीन बंडले एचडीपी पाईप, कृषी फवारणी पंप, हॉलोजन लाईट व वायरिंग, ग्रीन नेट, दोन ड्रम पाणी आणि मोबाईल फोन पूर्णपणे जळून गेले.
या घटनेमुळे गाताडे कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, कारण शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय असून सर्व आवश्यक अवजारे आगीत नष्ट झाली आहेत.
घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत सरपंच संतोष गोताड यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच तलाठी तृप्ती डोंगरे यांनीही पंचनामा करून नुकसानाची नोंद केली.
संगमेश्वर कनकाडी खालची गुरवावाडी येथे गोठ्याला भीषण आग, सुमारे पाच लाखांचे नुकसान





