GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर बसस्थानकात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला प्रवाशांसोबत वडापावचा आस्वाद; साधेपणाने जिंकली मने

Gramin Varta
408 Views

संगमेश्वर : एसटी बसस्थानक म्हटलं की अस्वच्छता, गर्दी आणि उपहारगृहांच्या तक्रारींचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. मात्र, संगमेश्वर बसस्थानकात शुक्रवारी रात्री घडलेल्या एका प्रसंगामुळे या सर्व समजुतींना छेद मिळाला आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी कोणताही राजशिष्टाचार किंवा बडेजाव न बाळगता थेट बसस्थानकाच्या उपहारगृहात जाऊन सर्वसामान्य प्रवाशांसोबत गरमागरम वडापाव आणि कॉफीचा आस्वाद घेतला. मंत्र्यांच्या या साध्या आणि सरळ भेटीमुळे उपस्थित प्रवाशांसह स्थानक कर्मचारीही अवाक झाले.

कोकण दौऱ्यावर असलेले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास संगमेश्वर बसस्थानकाला अचानक भेट दिली. नव्याने उभारण्यात आलेल्या या आधुनिक बसस्थानकात रात्रीच्या वेळीही प्रवाशांची मोठी वर्दळ होती. बसस्थानकावर उतरल्यानंतर मंत्री सरनाईक यांनी थेट बसची वाट पाहत थांबलेल्या प्रवाशांशी मनमोकळा संवाद साधला. प्रवाशांच्या अडचणी समजून घेत त्यांनी बसस्थानकावरील सुविधांबाबत आपुलकीने चौकशी केली. या आकस्मिक भेटीदरम्यान त्यांनी स्थानकातील प्रसाधनगृहे, हिरकणी कक्ष आणि इतर प्रवासी सुविधांची बारकाईने पाहणी केली. येथील स्वच्छता आणि एकूणच चोख व्यवस्थेबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले.

सुसज्ज आणि प्रसन्न वातावरणात नटलेल्या या बसस्थानकाची पाहणी करत असताना मंत्री महोदयांची पावले स्थानकातील एसटी उपहारगृहाकडे (कॅन्टीन) वळली. त्यावेळी तिथे अनेक प्रवासी गरमागरम भजी, वडापाव आणि चहा-कॉफीचा आनंद घेत होते. उपहारगृहातील खाद्यपदार्थांचा सुगंध आणि तेथील स्वच्छता पाहून मंत्र्यांनाही मोह आवरला नाही. त्यांनी सुरक्षारक्षक आणि अधिकाऱ्यांना बाजूला ठेवून थेट प्रवाशांच्या टेबलवर जाऊन बैठक मारली. त्यांनी प्रवाशांसोबत गप्पा मारत गरमागरम वडापाव आणि कॉफीची चव चाखली. राज्याचा कॅबिनेट मंत्री आपल्या शेजारी बसून सर्वसामान्यांसारखा वडापाव खातोय, यावर क्षणभर तिथे उपस्थित असलेल्या प्रवाशांचा विश्वासच बसत नव्हता. प्रवाशांच्या चेहऱ्यावर एकाच वेळी आश्चर्य आणि आनंदाचे भाव दाटून आले होते.
संगमेश्वर बसस्थानकातील हा प्रसंग केवळ एका शासकीय पाहणी दौऱ्यापुरता मर्यादित न राहता, एसटी महामंडळाच्या बदलत्या गतिमान चेहऱ्याचे आणि प्रवाशांशी असलेल्या आत्मीय नात्याचे अनोखे प्रतीक ठरला आहे. मंत्र्यांच्या या औचक भेटीमुळे आणि साधेपणामुळे लालपरीच्या सेवेत व गुणवत्तेत होत असलेल्या सकारात्मक बदलाची जिवंत साक्षच कोकणच्या प्रवाशांना अनुभवायला मिळाली, अशा भावना यावेळी प्रवाशांनी व्यक्त केल्या. या आगळ्यावेगळ्या भेटीची चर्चा सध्या संपूर्ण तालुक्यात रंगली आहे.

Total Visitor Counter

3440454
Share This Article