GRAMIN SEARCH BANNER

निवळी तिठा येथे मनाई आदेश धुडकावल्याप्रकरणी मुन्ना देसाई, परशुराम कदम यांच्यासह 20 ते 25 जणांवर गुन्हा

Gramin Varta
1.4k Views

रत्नागिरी: तालुक्यातील निवळी तिठा येथे राष्ट्रीय महामार्गावरील प्रलंबित कामांबाबत बेकायदेशीररीत्या जमाव जमवून प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी केदार देसाई, परशुराम कदम आणि राजेश सावंत यांच्यासह २० ते २५ जणांच्या जमावावर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास निवळी तिठा येथे करण्यात आली असून, पोलीस हवालदार रुपेश रघुनाथ भिसे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील निवळी तिठा येथील उड्डाणपूल, सर्व्हिस रोड आणि बोगद्याच्या कामाबाबत विविध मागण्या मांडण्यासाठी निवळी गावातील सुमारे २० ते २५ ग्रामस्थ एकत्र आले होते. यावेळी संशयित आरोपी मुन्ना देसाई उर्फ केदार मधुसूदन देसाई, परशुराम मास्ती कदम (दोन्ही रा. हातखंबा) आणि राजेश विनायक सावंत (रा. रत्नागिरी) यांनी जमावासमोर भाषणे करून विविध मागण्या मांडल्या. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १९ मार्च ते २ एप्रिल २०२६ या कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१), (३) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या या मनाई आदेशाचा भंग करून, पूर्वपरवानगीशिवाय जमाव जमवल्याने आणि भाषणबाजी केल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी २६ मार्च रोजी रात्री २०.२९ वाजता महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७(१), (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Total Visitor Counter

3379197
Share This Article