GRAMIN SEARCH BANNER

खेड तालुक्यात पाणीटंचाई तीव्र; ६ गावे, १० वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

खेड : तालुक्यात वाढत्या उन्हाच्या झळांमुळे पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असून अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील ६ गावे आणि १० वाड्यांमध्ये एका शासकीय टँकरद्वारे एक दिवस आड पाणीपुरवठा करण्यात येत असून प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तळे-धनगरवाडी, पालांडेवाडी आणि कासई-बोरवाडी येथील ग्रामस्थांनी पाण्याच्या टंचाईमुळे प्रशासनाकडे टँकरची मागणी केली आहे. संबंधित भागांचे सर्वेक्षण करून लवकरच या ठिकाणीही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, घेरारसाळगड-भराडे धनगरवाडी आणि निमणी-धनगरवाडी येथे प्रथम टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यानंतर कशेडी-बोरटोक, बंगला, खवटी-खालची धनगरवाडी, वरची धनगरवाडी, सवेणी-धनगरवाडी, केळणे-भोसलेवाडी, मांगलेवाडी, हुंबरी आणि म्हाळुंगे-धनगरवाडी या भागांमध्ये ९ एप्रिलपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

तालुक्यातील खवटी येथील खालची आणि वरची धनगरवाडी या भागांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता सर्वाधिक असून सुमारे १४५ लोकवस्ती असलेल्या या भागांना एका शासकीय टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. उपलब्ध पाण्याचे नियोजन करून ग्रामस्थांना पुरवठा केला जात आहे.

संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीचा पाणीपुरवठा विभाग सतर्क झाला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. पंचायत समितीच्या सभापती डॉ. आफिया पालेकर, उपसभापती सुनील मोरे आणि गटविकास अधिकारी गणेश मंडलिक हे या परिस्थितीवर विशेष लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना राबवत आहेत.

Total Visitor Counter

3473104
Share This Article