देवरुख: समोर बिबट्या दिसताच कोणालाही धडकी भरते. मात्र, संगमेश्वर तालुक्यातील किरबेट ओझरवाडी येथील अशोक रवंदे यांच्या कुटुंबियांनी बुधवारी पहाटे आलेल्या या संकटाचा सामना मोठ्या धाडसाने केला. भक्ष्याच्या शोधात बिबट्याने पहाटे चारच्या सुमारास थेट रवंदे यांच्या घरामध्ये प्रवेश केला आणि अवघे कुटुंबिय बिबट्याच्या तावडीतून बालंबाल बचावले. अशोक रवंदे यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला.
सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या किरबेट ओझरवाडीतील अशोक गंगाराम रवंदे हे बुधवारी पहाटे ४ च्या सुमारास घराबाहेर आले होते. याच क्षणाचा फायदा घेत, घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून बिबट्याने घरात शिरकाव केला. घरात बिबट्या शिरल्याची कल्पना नसताना रवंदे काही मिनिटांतच घरामध्ये परतले आणि दरवाजा लावून घेतला.
थोड्याच वेळात घरातून कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने रवंदे यांनी लाईट सुरू केली. यावेळी त्यांना बिबट्याने त्यांच्या कुत्र्यावर झडप घातल्याचे धक्कादायक दृश्य दिसले. हा प्रकार पाहून रवंदे यांनी तत्काळ आरडाओरड केली, ज्यामुळे घरातील सर्व कुटुंबिय खडबडून जागे झाले. घरातील गंगाराम सीताराम रवंदे (९५), सुंदराबाई रामचंद्र रवंदे (६०), आणि शेवंती अशोक रवंदे (५५) यांच्यासह सर्व सदस्य यामुळे भयभीत झाले. घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद असल्याने बिबट्याला बाहेर पडता येत नव्हते, त्यामुळे घरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सुमारे अर्धा तास ही जीवघेणी परिस्थिती कायम होती. एका बाजूला बिबट्या आणि दुसऱ्या बाजूला रवंदे कुटुंबिय होते. अशा भयावह स्थितीत अशोक रवंदे यांनी मोठे धाडस आणि समयसूचकता दाखवली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता घराचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच क्षणात बिबट्याने घरातून थेट जंगलात धूम ठोकली. जर दरवाजा उघडला नसता तर बिबट्याने घाबरून कुटुंबावर हल्ला केला असता, अशी भीती व्यक्त होत आहे. बिबट्याच्या या हल्ल्यात रवंदे यांचा कुत्रा जखमी झाला असून, त्याला वाचवण्यात यश आले आहे.
या घटनेची माहिती पोलीस पाटील प्रदीप अडबल यांनी वनविभागाला दिली. वनपाल सागर गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सहयोग कराडे यांनी सकाळी घटनास्थळी धाव घेतली आणि रवंदे कुटुंबियांची विचारपूस केली, तसेच त्यांना आवश्यक सूचना दिल्या. बिबट्याच्या या धाडसी प्रवेशामुळे या भागात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने परिसरात गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.