रत्नागिरी ःमुंबई-गोवा महामार्गावरील निवळी कोकजेवठार-सुतारवाडी येथील उतारात भरधाव कंटेनर उलटून झालेल्या अपघातात गंभीर जखमी चालकाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.
अपघाताची ही घटना शुक्रवारी (दि. 5) सकाळी 6.45 च्या सुमारास घडली.
सुभाष जगतपाल वर्मा (23, रा. बंडा, खुटार, छातरपूर, प्रतापगड, उत्तर प्रदेश) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. याबाबत पोलिस पाटील संजना संजय पवार (41, रा. निवळी कोकजेवठार, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, श्ाुक्रवारी सकाळी सुभाष वर्मा हा आपल्या ताब्यातील कंटेनर (एमएच 46 बीबी 1537) मधून ऑक्सिजन व हेलियम गॅस घेऊन जयगड ते मुंबई असा भरधाव वेगाने जात होता. तो निवळी बावनदी-सुतारवाडी येथील उतारातील वळणात आला असता सुभाषचा कंटनेरवरील ताबा सुटला. त्यामुळे कंटेनर उलटून अपघात झाला. यात गंभीर जखमी झालेल्या सुभाषला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी अपघाताची पंचनामा करून कंटेनर बाजूला करत रहदारी सुरळीत केली. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. स्वतःच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी चालक सुभाष वर्मावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवळी घाटात कंटेनर उलटून चालकाचा मृत्यू
