समीर चाळके यांचे बांधकाम विभागाला निवेदन; आठ दिवसांत डागडुजी न झाल्यास आंदोलनाचा इशारा
संगमेश्वर : तालुक्यातील कर्ली फाटा ते देवघर या सुमारे ६ किमी अंतराच्या रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ग्रामस्थांचे जीवन त्रस्त झाले आहे. या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यात यावी, या मागणीसाठी कर्ली-देवघरचे तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष समीर चाळके यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे शुक्रवारी निवेदन दिले.
चाळके यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, आठ दिवसांत रस्त्याची डागडुजी न झाल्यास ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन छेडले जाईल.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, या रस्त्यावर सतत अपघात होत असून, रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडाझुडपांमुळे वाहनचालकांना अडथळे येत आहेत. विशेष म्हणजे, गावात ९० टक्के ज्येष्ठ नागरिक तसेच गरोदर महिलांचा वावर असून, या रस्त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. गावात दवाखान्याची सुविधाही नसल्याने रुग्णांना देवरूख गाठावे लागते, तसेच शिक्षणासाठी विद्यार्थीही याच रस्त्यावरून प्रवास करतात. त्यामुळे सर्वच वयोगटांतील नागरिकांना खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
समीर चाळके यांनी सांगितले की, रस्त्याची त्वरीत डागडुजी न झाल्यास आंदोलन अटळ आहे, आणि याची जबाबदारी संबंधित विभागावर राहील. ग्रामस्थांत संतापाचे वातावरण असून, आता रस्त्याच्या डागडुजीसाठी प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देवरुख कर्ली फाटा ते देवघर रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
