मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने यंदा २६२ गणपती विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी २०० आरक्षित विशेष गाड्यांसाठी आतापर्यंत तब्बल १ लाख १७ हजार ६८२ प्रवाशांनी आरक्षण केले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवासाला मोठी मागणी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होत असून, त्यापूर्वी मुंबई आणि उपनगरांत वास्तव्यास असलेले हजारो चाकरमानी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी कोकणाकडे रवाना होतात. नियमित गाड्यांचे आरक्षण सुरू होताच काही सेकंदांत जागा भरून जात असल्याने विशेष गाड्यांना प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. यंदा प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन आरक्षित गाड्यांसोबत अनारक्षित विशेष गाड्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या २६२ विशेष गाड्यांमध्ये २०० आरक्षित आणि ६२ अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे. आरक्षित विशेष गाड्यांमध्ये वातानुकूलित सेवांसह शयनयान आणि सामान्य डब्यांचे मिश्रण असलेल्या गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरहून कोकणातील विविध ठिकाणांसाठी या विशेष सेवा धावणार असून, त्यांची सुरुवात ९ सप्टेंबरपासून होणार आहे.
कोकणातील प्रमुख स्थानकांचा विचार करता सावंतवाडी रोडसाठी सर्वाधिक ११२ जाण्या-येण्याच्या सेवा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ रत्नागिरीसाठी ६४, तर मडगावसाठी २४ सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष गाड्यांमुळे नियमित गाड्यांचे आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांना प्रवासासाठी अतिरिक्त पर्याय उपलब्ध होणार असून, अनारक्षित गाड्यांमुळे ऐनवेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही दिलासा मिळणार आहे.
गणेशोत्सवातील गर्दीचे नियोजन करण्यासाठी मध्य रेल्वेकडून प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त व्यवस्था करण्यात येणार आहे. अतिरिक्त तिकीट खिडक्या, प्रतीक्षा क्षेत्र आणि रांग व्यवस्थापनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष गाड्यांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आरपीएफ जवान तसेच तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रवाशांना पाणी, अन्न आणि स्वच्छतागृहांची सुविधा मिळावी यासाठी स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेतली जाणार आहे.
प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या किमान अर्धा तास आधी स्थानकावर पोहोचावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे. विशेष गाड्यांचे वेळापत्रक, मार्ग आणि थांब्यांची माहिती एनटीईएस ॲपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अनारक्षित तिकिटांसाठी यूटीएस, तर आरक्षित तिकिटांसाठी ‘रेलवन’ ॲपचा वापर करता येणार आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने केलेल्या या विशेष व्यवस्थेमुळे कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार असून, प्रवाशांना आगाऊ नियोजन करून आपल्या गावी पोहोचणे अधिक सुलभ होणार आहे.






