मुंबई (विशेष प्रतिनिधी): कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणि चाकरमान्यांसाठी भारतीय रेल्वे मंत्रालयाने मोठा दिलासा दिला असून मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणाऱ्या नवीन विशेष गाडीचा भव्य उद्घाटन सोहळा उद्या, गुरुवारी ३ सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहे. सण-उत्सवांच्या काळात कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता, प्रशासनाने गाडी क्रमांक ०१००१ मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी रोड ही ‘इनॉग्युरल स्पेशल’ रेल्वे उद्यापासून सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, ही विशेष गाडी उद्या ३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सावंतवाडीसाठी रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे २ वाजता ती सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल. कोकणातील प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
आधुनिक आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देण्यासाठी ही गाडी १६ एलएचबी (LHB) डब्यांची असणार आहे. यामध्ये १ प्रथम श्रेणी वातानुकूलित (First Class AC), २ द्वितीय श्रेणी वातानुकूलित (2-Tier AC), ३ तृतीय श्रेणी वातानुकूलित (3-Tier AC), ४ स्लीपर, ४ अनारक्षित (General) डबे, तसेच १ एसएलआर/डी आणि १ जनरेटर कारचा समावेश आहे. उद्या होणाऱ्या या नव्या रेल्वे सेवेचा कोकणवासीयांनी आणि चाकरमान्यांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी केले आहे.






